प्रशांत चंदनखेडे वणी :-
ट्रक व कारच्या झालेल्या विचित्र व भीषण अपघातात कारमधील एकाच परिवारातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार 31ऑक्टोबरला सकाळी 11 वाजताच्या सुमारास वणी घुग्गुस मार्गावरील जन्नत सिलिब्रेशन हॉल पासून काही अंतरावर घडली. मुलीला कार चालविणे शिकवीत असताना हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.
लालपुलिया परिसरात रियाज मिस्त्री म्हणून प्रसिद्ध असलेले व ट्रक दुरुस्तीचे काम करणारे रियाज शेख यांचे श्री ऑटो मोबाईल जवळ स्वतःचे गॅरेज देखील आहे. शहरातील भीमनगर परिसरातील बुद्धविहाराजवळ त्याचं वास्तव्य होतं. आज सकाळी मुलीला कार शिकविण्याकरिता ते घुग्गुस मार्गावर गेले असता जन्नत हॉल जवळ कार शिकणाऱ्या मुलीचे कारवरील नियंत्रण सुटले व कार दुभाजकावरून उसळून महामार्गाच्या विरुद्ध लेनवर आदळल्याने वणी वरून घुग्गुसकडे जाणाऱ्या ट्रकची कारला जोरदार धडक बसली. ट्रकच्या धडकेत कार अक्षरशः चक्काचूर झाल्याने कारमधील तीन मुली जागीच ठार झाल्या तर अपघातात गंभीर जखमी झालेले वडील रियाज शेख यांचा रुग्णालयात हलविल्यानंतर मृत्यू झाला. तसेच कारमध्येच असलेली रियाज यांच्या भावाची मुलगी जखमी झाली असून तीला नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे. मुलीला कार चालविणे शिकवितांना काळाने घाला घातला आणि भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. ही बातमी प्राथमिक माहिती वरून घेण्यात आली आहे. आणखी माहिती मिळाल्यानंतर विस्तृत बातमी घेण्यात येईल.

No comments: