शुक्रवार ठरला अपघातवार, कार अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने समाजमन हेलावले तर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक वृद्ध दगावला
प्रशांत चंदनखेडे वणी :-
ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा दिवस एका कुटुंबातील चार जणांसाठीही शेवटचा ठरला. शुक्रवार ३१ ऑक्टोबर हा अपघातवार ठरला. एका हसत्या खेळत्या कुटुंबावर काळाने झडप घातली आणि कुटुंबातील कर्त्या पुरुषासह तीन मुलींना कायमचे हिरावून घेतले. कार खरेदी केल्यानंतर आपल्या मुलीला कार चालवणे शिकवत असतांना नियतीने डाव साधला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. कार चालविणे शिकत असलेल्या मुलीचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट दुभाजकावरून उसळून महामार्गाच्या विरुद्ध लेनवर आदळली. त्याचवेळी त्या लेनवरून घुग्गुसकडे भरधाव जाणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कार चालवणाऱ्या मुलीसह तिच्या दोन चिमुकल्या बहिणी आणि कुटुंबासाठी आयुष्य वेचणाऱ्या बापाचा करून अंत झाला. हा भीषण अपघात घडत नाही तोच लालगुडा चौपाटीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक वृद्ध इसम मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळाली आहे. किसन दसरु लेडांगे वय अंदाजे ६५ वर्षे रा. वागदरा (नवीन) असे या अपघात झाल्याचा संशय असलेल्या मृत वृद्धाचे नाव आहे.
आज उजळलेला महिन्याचा शेवटचा दिवस शहरात दुःखाचं सावट पसरवून गेला. एका हसत्या खेळत्या कुटुंबावर नियती कोपली आणि कुटुंबातील चार जणांना काळाने कायमचे हिरावून घेतले. कुटुंबात कार घेतल्याचा आनंद होता तर मुलीलाही कार चालविणे शिकवायचे या उद्देशाने वडील रियाजुद्दीन शेख हे मुलीला कार चालविणे शिकवत होते. शुक्रवारला गॅरेज बंद असल्याने सकाळीच ते मुलीला कार चालविण्याचा सराव करून घेण्याकरिता घुग्गुस मार्गाने कार घेऊन गेले. घुग्गुस मार्गावर कार चालविण्याचा सराव केल्यानंतर घुग्गुस मार्गाने वणीकडे येत असतांना जन्नत हॉल जवळ मुलीचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट दुभाजकावरून उसळून विरुद्ध लेनवर आदळली.
त्याचवेळी वणी वरून घुग्गुसकडे जात असलेल्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कार चालवीत असलेली माएरा रियाजुद्दीन शेख (१७) हिच्यासह तिच्या दोन बहिणी जोया शेख (१२) व अनिबा शेख (१०) या घटनास्थळीच ठार झाल्या. तर वडील रियाजुद्दीन रफीऊद्दीन शेख (५२) यांना रुग्णालयात हलविल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. तसेच कारमध्ये असलेली इनाथा शारीख शेख (५) ही चिमुकली गंभीर जखमी झाल्याने तिला आधी चंद्रपूर येथे तर नंतर तेथून नागपूर येथे हलविण्यात आले. तिच्यावर नागपूर येथे उपचार सुरु असल्याचे समजते. शहरातील भीमनगर परिसरातील बुद्धविहाराजवळ हे कुटुंबं वास्तव्यास होतं. अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शहरात शोककळा पसरली असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
सकाळी ११ वाजता हा अपघात घडत नाही तोच लालगुडा चौपाटी पासून वागदराकडे जाणाऱ्या उतार रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू झाला. नवीन वागदरा येथील रहिवाशी असलेले किसन दसरु लेडांगे हे लालगुडा चौपाटीकडे येत असतांना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वृद्धाला धडक दिल्यानंतर वाहन चालक हा वाहनासह पसार झाल्याचे सांगण्यात येते. किसन लेडांगे यांच्या पश्च्यात पत्नी, चार मुली व एक मुलगा असा आप्त परिवार आहे. त्यांच्या अपघाती निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

No comments: