Latest News

Latest News
Loading...

नवविवाहित दाम्पत्याने विहरीत उडी घेऊन केली आत्महत्या, एक महिन्याआधी झाले होते लग्न


प्रशांत चंदनखेडे वणी :-

नवविवाहित दाम्पत्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची मन सुन्न करणारी घटना मारेगाव तालुक्यातील सगणापूर येथे सोमवार ८ जूनला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अंगावरील हळद व हातावरील मेहंदी सुकण्यापूर्वीच या जोडप्याने जगाचा निरोप घेतल्याने गावात हळहळ व्यक्त होत असून समाजमन हेलावले आहे. जेमतेम एक महिण्यापुर्वी बोहल्यावर चढलेल्या या नवदाम्पत्याने सांसारिक जीवन व्यतीत करण्यापूर्वीच मृत्यूला कवटाळल्याने सगणापूर हे छोटंसं गाव हळहळलं आहे. या व्ह्रदयद्रावक घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. लग्नविधी पूर्ण करतांना जीवनभर साथ निभावण्याची प्रतिज्ञा घेणाऱ्या या नवविवाहित जोडप्याने जोडीनेच विहिरीत उडी घेऊन जीवनाचा शेवट केला. सांसारिक जीवनाची सुख स्वप्ने रंगविण्याच्या काळात या नवदाम्पत्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने सर्वच थक्क झाले आहेत. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे. आशिष धानोरकर (२४) व करिष्मा धानोरकर (१९) असे या जीवनातून एक्झिट घेतलेल्या नवविवाहित जोडप्याचे नाव आहे.

मारेगाव तालुक्यातील सगणापूर गावात आशिष व करिष्मा हे नवविवाहित दाम्पत्य कुटुंबासह राहत होतं. एक महिन्यापूर्वी या दोघांचं लग्न झालं होतं. अंगावरील हळद व हातावरील मेहंदीही सुकली नव्हती की, या दोघांनी मृत्यूचं दार ठोठावलं. विहरीत उडी घेऊन दोघांनीही मृत्यूला कवटाळलं. दोघांनीही कंबरेला दगड बांधून जोडीनेच विहरीत उडी घेतली. आणि सांसारिक सहवासात जीवन घालविण्याआधीच ते मृत्यूच्या कवेत सामावले. मानसिक वैफल्यातून त्यांनी जीवनाचा शेवट केला. मात्र सांसारिक जीवनाच्या सुरवातीलाच त्यांनी मृत्यूचा मार्ग निवडल्याने, प्रत्येकाला एकच प्रश्न पडला, तो म्हणजे त्यांनी असे का केले. 

रीती रिवाजानुसार लग्नविधी पार पडल्यानंतर सांसारिक जीवनात पदार्पण केलेल्या या दाम्पत्याने एक महिन्याच्या सहवासातच जीवनाची गाठ सोडून मृत्यूशी गाठ बांधली. जगण्याची आस सोडून मरणाची कास धरलेल्या या जोडप्याने कुठल्या विवंचनेतून हा मार्ग निवडला, हा प्रश्न सर्वांनाच छळू लागला आहे. लग्नाचा आनंद ओसरण्याआधीच या जोडप्याने जगाचा निरोप घेतला. आणि घरातील आनंदाच्या वातावरणावर विरजण आलं.  कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा आघात झाला.

आशिष धानोरकर आणि करिष्मा गेडाम हे ४ मे ला लग्न बंधनात बंधले. लग्नानंतर ते कुटुंबियांसोबत राहू लागले. एक महिन्याच्या संसारातच असं काय घडलं की या दोघांनीही जीवन संपविण्याचा कठोर निर्णय घेतला. ८ जूनला हे नवविवाहित पती पत्नी मृत्यूच्या प्रवासाला निघाले. मोटारसायकलने ते रात्री ८ वाजता घराबाहेर पडले. नंतर बराच वेळ होऊनही ते घरी न परतल्याने कुटुंबियांना काळजी वाटू लागली. कुटुंबीयांनी जिकडे तिकडे त्यांची चौकशी सुरु केली. मात्र या दोघांची कुठेही खबरबात न मिळाल्याने शेवटी त्यांचा सर्वत्र शोधा शोध घेण्यात आला. दरम्यान नवरगाव येथील एका शेतातील विहिरीजवळ आशीषची मोटारसायकल आढळून आली. नंतर गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीत पाहणी केली असता दोघांनीही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. 

एकमेकांना कवटाळलेले हे दोन जीव मृत शरीराच्या रूपाने बाहेर काढण्यात आले. त्यावेळी कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा होता. अश्रूंचा बांध थांबता थांबत नव्हता. धायमोकलून रडणाऱ्या कुटुंबाचा आक्रोश व्ह्रदय चिरून टाकणारा होता. नंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस क्षणात घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. एक महिन्यापूर्वी लग्न बंधनात बांधलेल्या या दाम्पत्याने आत्महत्या का केली, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. पोलीस त्यांच्या आत्महत्येचे कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. पुढील तपास ठाणेदार शाम वानखेडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे.


No comments:

Powered by Blogger.