Latest News

Latest News
Loading...

मैत्री दिनीच काळाचा घाला; वर्धा नदीत बुडून पाच जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

प्रशांत चंदनखेडे वणी :-

जागतिक जिवलग मित्र दिनीच नियतीने क्रूर खेळी करत घुग्घूस येथील पाच जिवलग मित्रांना कायमचे हिरावून नेले. म्हातारदेवी गावाजवळील वर्धा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या पाच तरुणांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे संपूर्ण घुग्गुस शहरावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिव केळझरकर (१८), सनी आसमपल्ली (१८), समय सोंटक्के (१७), तन्मय पथाडे (१७) आणि रोहित बोबडे (१९) हे पाचही मित्र सोमवारी दुपारच्या सुमारास म्हातारदेवी गावाजवळील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले होते. मात्र नदीतील खोल पाणी आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाल्याचे सांगण्यात येत आहे.

सायंकाळपर्यंत मुले घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान, वर्धा नदीच्या काठावर मुलांचे कपडे, चप्पल आणि मोबाईल आढळून आल्याने पालकांच्या काळजात धडकी भरली. त्यांनी तात्काळ घुग्घूस पोलिसांना ही माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक गोताखोरांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. मात्र अंधार आणि नदीतील परिस्थितीमुळे रात्री शोधकार्य थांबविण्यात आले. मंगळवारी सकाळी चंद्रपूर येथून विशेष बचाव पथक पाचारण करण्यात आले. बोटींच्या सहाय्याने सुरू करण्यात आलेल्या शोधमोहीमेदरम्यान नदीतून एकामागोमाग पाचही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

या दुर्घटनेने घुग्गुस येथील इंदिरानगर परिसरासह संपूर्ण शहर सुन्न झाले आहे. एकाच परिसरातील आणि अतिशय जिवलग असलेल्या पाच मित्रांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

शिव, सनी, समय, तन्मय आणि रोहित ही केवळ नावे नव्हती, तर आपल्या कुटुंबाच्या आशा-आकांक्षा आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्ने घेऊन जगणारी उमलती तरुणाई होती. त्यांच्या अकाली निधनामुळे पाचही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून आप्तस्वकीय शोकमग्न झाले आहेत. तसेच संपूर्ण घुग्गुस शहरात शोककळा पसरली आहे.

विशेष म्हणजे, ज्या दिवशी जगभरात मैत्रीचे नाते साजरे केले जात होते, त्याच दिवशी या पाच जिवलग मित्रांनी जगाचा निरोप घेतल्याने या घटनेची वेदना अधिकच तीव्र झाली आहे. वर्धा नदीतील ही दुर्दैवी घटना संबंधित कुटुंबांवर दुःखाचा आघात करणारी ठरली असून या दुर्घटनेमुळे समाजमन हेलावले आहे. समाजमनाला चटका लावणारी ही घटना ठरली आहे. मैत्रीचं नातं जीवापाड जपणाऱ्या या पाचही तरुणांना वर्धा नदीत जलसमाधी मिळाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

एकत्र जगणारे, एकत्र फिरणारे आणि स्वप्नांच्या वाटेवर सोबत चालणारे हे मित्र अखेर नियतीच्या हाकेलाही एकत्रच प्रतिसाद देत काळाच्या पडद्याआड गेले; आणि घुग्घूसच्या इतिहासात वेदनेची एक काळी नोंद करून गेले.

No comments:

Powered by Blogger.