Latest News

Latest News
Loading...

प्रवाशांच्या सेवेसाठी गोदावरी अर्बनचा सामाजिक पुढाकार

प्रशांत चंदनखेडे वणी :-

सहकार क्षेत्रात विश्वासार्हता आणि सामाजिक बांधिलकीची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटी लिमिटेड, वणी शाखेचा ९ वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त केवळ औपचारिक कार्यक्रम न घेता समाजोपयोगी उपक्रम राबवत वणी बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या सुविधेसाठी सिमेंट खुर्च्या बसविण्यात आल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रवाशांना बसची प्रतीक्षा करताना बसस्थानक परिसरात बसण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, या लोकाभिमुख उद्देशातून हा उपक्रम राबविण्यात आला. गोदावरी अर्बनचे संस्थापक अध्यक्ष हेमंत पाटील व अध्यक्षा जयश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गोदावरी अर्बनचे शाखा व्यवस्थापक विजय मोडक यांच्या नेतृत्वात हा उपक्रम पार पडला.

कार्यक्रमाला एजीएम रवि इंगळे, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, वणी आगार प्रमुख लता मुळेवार, वाहतूक निरीक्षक जयश्री मेश्राम, लेखाधिकारी कुंतीलाल चव्हाण यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. उपस्थितांनी गोदावरी अर्बनच्या सामाजिक जाणीवेचे कौतुक करत सहकार क्षेत्राने समाजाशी नाळ जोडून काम करण्याची गरज अधोरेखित केली.
अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास संपादन करत १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक ठेवींचा टप्पा पार करणाऱ्या वणी शाखेची प्रगती उल्लेखनीय मानली जात आहे. ग्राहकाभिमुख सेवा, पारदर्शक व्यवहार आणि सामाजिक उत्तरदायित्व यामुळे गोदावरी अर्बनने सहकार क्षेत्रात स्वतःची वेगळी छाप निर्माण केली आहे.

या यशामागे शाखा व्यवस्थापक, कर्मचारी, दैनिक बचत प्रतिनिधी व अभिकर्ते तसेच संचालक मंडळाचे सातत्यपूर्ण योगदान असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुनील चिंचोलकर, प्रांजली ठाकरे, अक्षय अणे, रविंद्र लोथे, अपर्णा केदार, विद्या निंबाळकर, अमोल देऊळकर, मंगेश करंडे, आतिष बुरेवार, जयवंत ओचावार तसेच दैनिक अभिकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.


No comments:

Powered by Blogger.