प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहराच्या विकासाच्या गप्पा रंगत असताना दुसरीकडे शहरातील रस्त्यांची अवस्था मात्र दिवसेंदिवस बिकट होत आहे. शहरातील प्रमुख मार्गांसह अंतर्गत रस्त्यांची अवस्था अतिशय गंभीर झाली असून अनेक रस्ते अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात सापडले आहेत. काही रस्त्यांची चाळण झाली असून काही ठिकाणी रस्ता आहे की खड्डे, हेच ओळखणे कठीण झाले आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्यानंतर त्यांची खोली लक्षात येत नसल्याने वाहनधारकांसाठी हे खड्डे अपघाताचे सापळे ठरत आहेत. रस्त्यांची दुरुस्ती व नव्याने बांधकाम करण्याकडे नगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शहरातील अनेक रस्ते काही वर्षांतच उखडले असून, काही ठिकाणी डागडुजीच्या नावाखाली केलेली मलमपट्टीही पावसात वाहून गेली आहे. तर काही रस्त्यांच्या नव्या बांधकामाचा मुहूर्तच अद्याप निघालेला नाही. त्यामुळे नागरिकांच्या संयमाचा बांध आता फुटण्याच्या मार्गावर आहे.
विठ्ठलवाडी परिसरातील एसबी लॉनमार्गे शहराकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. तसेच विठ्ठलवाडीमार्गे नांदेपेरा मार्गाला जोडणाऱ्या डीपी रोडवरही ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रेल्वे स्टेशन, विठ्ठलवाडी आणि गौरकार कॉलनीकडे जाण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग असल्याने या रस्त्यावर दिवसभर मोठी वर्दळ असते. स्कूल बस, ऑटो, दुचाकी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांची वाहने याच मार्गावरून धावत असतात. त्यामुळे खराब रस्त्याचा फटका थेट विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
या परिसरात नर्सिंग स्कूल, कोचिंग क्लासेस, मंगल कार्यालयांसह विविध आस्थापना असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत रस्त्याची झालेली दुरवस्था अपघाताचा धोका वाढविणारी ठरत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना खड्डे चुकविताना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत असल्याचे चित्र आहे.
दीपक चौपाटी ते गोकुळनगरकडे जाणाऱ्या रस्त्याची तर अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर असंख्य खड्डे पडल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रस्ता की तळे, असा प्रश्न निर्माण होतो. वणी–घुग्घुस मार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता असून गोकुळनगर, रज्जानगर तसेच वागदरा परिसराकडे जाण्यासाठी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
या मार्गावरून दुचाकीने प्रवास करणे धोकादायक बनले असून किरकोळ अपघात या रस्त्यावर नित्येचेच झाले असल्याचे नागरिक सांगतात. रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी अनेकदा करण्यात आली. निवेदने आणि आंदोलनेही झाली; मात्र हा रस्ता नव्याने बांधण्याऐवजी वरवरची मलमपट्टी केली जात असल्याने समस्या कायम आहे.
इंदिरा चौक–हमीद चौक, पंचशीलनगर–ब्राह्मणी फाटा रस्त्यांचीही ‘परीक्षा’
इंदिरा चौक ते हमीद चौक आणि पंचशीलनगर ते ब्राह्मणी फाटा या मार्गांचीही अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हे रस्ते आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहेत. रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने या मार्गांवरून वाहन चालविणे जिकिरीचे झाले आहे. पंचशीलनगर–ब्राह्मणी फाटा हा मार्ग निळापूर, ब्राह्मणीमार्गे उकणीकडे जाणाऱ्या नागरिकांसाठी सोयीचा आणि महत्त्वाचा मार्ग आहे. तसेच अनेक रहिवासी वस्त्या या मार्गालगत असल्याने या मार्गावर दिवसभर मोठी वर्दळ व रहदारी सुरु असते.
मात्र, रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की, पांदण रस्ताही यापेक्षा बरा, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी वारंवार करूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे
‘अपघातानंतरच प्रशासन जागे होणार का?’
शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांवर पडलेले खड्डे केवळ गैरसोयीचे राहिले नसून ते आता सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनले आहेत. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी, त्यातून वाहने हाकण्याची कसरत आणि त्याचवेळी समोरून येणारी वाहने यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी ही परिस्थिती चिंताजनक आहे.
रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत नागरिकांकडून सातत्याने मागणी होत असतानाही नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप होत आहे. एखादा मोठा अपघात घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत.
शहरातील रस्त्यांची तातडीने पाहणी करून धोकादायक खड्डे बुजविण्यासह आवश्यक त्या ठिकाणी रस्त्यांचे मजबुतीकरण व नव्याने बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा रस्त्यांच्या प्रश्नावर नागरिकांचा संयम सुटून जनआक्रोश उफाळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


No comments: