वणी–शिरपूर मार्गावरील चारगाव–मोहदा–कृष्णानपूर–पुरड मार्गे वणी आगाराची बससेवा अखेर सुरू झाली अन् प्रवाशांच्या चेहऱ्यावर समाधान उमटले. विद्यार्थ्यांसह शेतकरी, नोकरदार, व्यापारी आणि नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, बससेवा सुरू होताच त्याचे श्रेय लाटण्यासाठी गावातील राजकीय गाडीही सुसाट धावू लागली आहे. बस कोणाच्या प्रयत्नातून सुरू झाली, यावरून सध्या मोहदा परिसरात चांगलीच राजकीय चर्चा रंगली आहे.
ओव्हरलोड वाहनांच्या वाहतुकीमुळे या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली होती. परिणामी बससेवा बंद पडल्याने या मार्गावरील विविध गावांतील नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी अडचणी येत होत्या, तर नागरिकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे बससेवा पूर्ववत करण्याची मागणी सातत्याने होत होती.
या मागणीसाठी परिसरातील विविध गावांतील राजकीय व सामाजिक पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी, युवक तसेच ग्रामस्थांनी आपल्या परीने प्रशासनाकडे निवेदने देत पाठपुरावा केला. अखेर बससेवा सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र, बस सुरू होताच ‘आम्ही पाठपुरावा केला’, ‘आम्ही निवेदन दिले’, ‘आमच्या प्रयत्नांतून बस सुरू झाली’ अशा दाव्यांची चर्चा सुरू झाल्याने गावातील राजकीय वातावरण चांगलेच रंगले आहे.
कोणी आपण निवेदन दिल्याचा दावा करीत आहे, तर कोणी अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगत आहे. काही जणांकडून तर ‘एका फोनवर बससेवा सुरू झाली’ असा दावाही केला जात असल्याने श्रेयवादाला चांगलेच उधाण आले आहे. त्यामुळे बससेवा एकच; मात्र श्रेय घेणारे अनेक, अशी चर्चा परिसरात रंगताना दिसत आहे.
बससेवा ही नागरिकांच्या सामूहिक मागणीचा आणि पाठपुराव्याचा परिणाम असताना तिचे श्रेय घेण्यासाठी सुरू झालेल्या चढाओढीची गावात मिश्कील चर्चा होत आहे. ‘प्रवाशांना बस मिळाली, पण श्रेयाच्या बसमध्ये पहिल्यांदा कोण चढले?’ असा सवालही नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
बसच्या निमित्ताने राजकीय समीकरणांचीही चर्चा
बससेवेचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर मोहद्यातील राजकीय चर्चेनेही वेग घेतला आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका कुटुंबातील दोन व्यक्ती वेगवेगळ्या राजकीय भूमिकांसह संभाव्य उमेदवारीच्या चर्चेत असल्याची चर्चा गावात सुरू आहे. त्यातून कमळ विरुद्ध धनुष्यबाण अशा संभाव्य राजकीय समीकरणांचीही कुजबुज रंगू लागली आहे.
अर्थात, संबंधित उमेदवारीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेली चर्चा ही स्थानिक पातळीवरील राजकीय अंदाज आणि चर्चेपुरतीच आहे. मात्र, एकाच कुटुंबातील संभाव्य राजकीय दावेदारीमुळे आगामी निवडणुकीत गावातील राजकीय गणित बदलणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
बससेवा सुरू होणे ही मोहदा आणि परिसरातील नागरिकांसाठी निश्चितच दिलासादायक बाब आहे. आता या बससेवेचे श्रेय कोणाला मिळते, यापेक्षा ती नियमित आणि सुरळीत सुरू राहते का, हा प्रवाशांसाठी अधिक महत्त्वाचा प्रश्न आहे. दरम्यान, बसच्या प्रवासाला सुरुवात झाली असली तरी मोहद्यातील राजकीय चर्चेचा प्रवास मात्र आता कुठे जाऊन थांबतो, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

No comments: