नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

प्रशांत चंदनखेडे वणी 

प्रवासी रेल्वेने कटून एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि. ५ मे ला दुपारी ११ ते ११.३० वाजताच्या सुमारास वणी रेल्वे स्टेशन जवळ घडली. तरुणीने रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रश्मी धनराज पराते (२०) रा. शास्त्रीनगर असे या मृत तरुणीचे नाव आहे.

ही तरुणी अनेक दिवसांपासून आजारी असल्याचे सांगण्यात येते. तिच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आल्याचेही आई वडिलांचे म्हणणे आहे. नुकताच तिच्यावर नागपूर येथील एम्स रुग्णालयात उपचार करून तिला घरी आणले होते. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तिला कुठलाही गंभीर आजार नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत होते, असे तिच्या आई वडिलांचे म्हणणे आहे. मात्र ती अतिशय अशक्त होती. ती २० वर्ष वयाची असतांनाही तिचे वजन अवघे २० ते २१ किलो होते. त्यामुळे ती मानसिक तणावात राहायची. अशातच आज तिने बल्लारशा मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस खाली येऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. मृतक रश्मीच्या वडिलांचे टी-स्टाल असून तिला एक बहीण देखील आहे. आज बहिणीचा पेपर असतांना तिच्या लहान बहिणीने आत्महत्या केल्याने मोठ्या बहिणीला प्रचंड धक्का बसला.  

वणी रेल्वे स्थानक येथे एकच प्लॅटफार्म असतांना आज वणी रेल्वे स्थानकावर एकाच वेळी दोन प्रवासी गाड्या धडकल्या. बल्लारशा-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस प्लॅटफार्मवर थांबली. तर मुंबई-बल्लारशा नंदीग्राम एक्सप्रेस लूप लाईनवर थांबविण्यात आली. आणि असे पहिल्यांदाच झाले आहे. प्लॅटफार्म एकच असतांना दोन प्रवासी रेल्वे एकाच वेळी रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दोन प्रवासी रेल्वे आजूबाजूने उभ्या असल्याने या मुलीकडे कुणाचेही लक्ष गेले नाही. मृतक रश्मी ही खूप वेळपासून रेल्वे स्थानकावर उभी असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. ती मुंबईकडे जाणाऱ्या दिशेने प्लॅटफार्मवर उभी होती. तर ती माजरीकडे जाणाऱ्या दिशेने रेल्वेने कटल्याचे दिसून आले. 

ही तरुणी रेल्वेखाली आल्याने तिचे शीर धडावेगळे झाले होते. मुलीच्या अशा या दुर्दवी मुत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच एपीआय धीरज गुल्हाने, सुदामा आसोरे, निलेश अपसुंदे यांच्यासह जमादार अविनाश बनकर हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच स्टेशन मास्टर प्रेम कुमार रंजन हे देखील घटनास्थळी उपस्थित होते. तर रेल्वे पोलिसांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. पुढील तपास पोलिस करीत आहे.


Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी