प्रशांत चंदनखेडे वणी
वणी आगारासाठी १० नवीन एसटी बसेस मंजूर झाल्या आहेत. वणीकरांसाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. वणी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजय देरकर यांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले आहे. आमदार संजय देरकर यांनी विधानसभेत वणी आगारासाठी नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्याचा मुद्दा रेटून धरला होता. त्यानुषंगाने वणी आगारासाठी १० नवीन एसटी बसेस मंजूर झाल्या असून सोमवार दि.५ मे ला ५ नवीन बसेस आगाराला मिळणार आहेत. आमदारांनी वणी आगारासाठी एकूण २५ नवीन एसटी बसेसची मागणी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती. मात्र सध्या त्यांनी १० नवीन एसटी बसेस देण्याचे मान्य केले आहे. सोमवारला ५ तर उर्वरित ५ बसेस लवकरच वणी आगाराला देण्यात येणार आहे. वणी आगाराला नवीन ५ एसटी बसेस मिळणार असल्याच्या वृत्ताला आगार प्रमुख बन्सोड यांनी देखील दुजोरा दिला आहे.
वणी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय नुकताच जाहीर झाला आहे. आमदार संजय देरकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात वणी एस.टी. आगारासाठी बसगाड्यांची मागणी अत्यंत ठामपणे मांडली होती. त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि जोरदार पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने ५ नवीन एस.टी. बसेस मंजूर केल्या आहेत. ही मंजुरी वणी विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देणारी आहे.
वणी विधानसभा क्षेत्रात अनेक गावांमधून रोज शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहनाअभावी शिक्षणात अडथळे येत होते. प्रवासात होणारा वेळेचा अपव्यय, अपुरी व अनियमित बससेवा यामुळे त्यांच्या भविष्यावर परिणाम होत होता. तसेच बाजारपेठांमध्ये ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना देखील प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता संजय देरकर यांनी हा विषय केवळ विधानसभेतच उपस्थित केला नाही, तर ते प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा करीत राहिले.
त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले असून ५ नवीन एस.टी. बसेस वणी आगारासाठी मंजूर झाल्या आहेत. त्या लवकरच प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध होणार आहेत. या बसेस ग्रामीण भागाला शहराशी अधिक मजबूतपणे जोडतील. तसेच शिक्षण, आरोग्य व व्यापारासाठी नागरिकांचा प्रवास अधिकच सुलभ, सुरक्षित व वेळेवर होईल.
आमदारांनी बसगाड्यांसाठी केलेल्या मागणीला मिळालेली मंजुरी म्हणजे वणी विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या विकासासाठी झटणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या कार्यक्षमतेचा हा ठोस पुरावा आहे. या निर्णयामुळे मतदारसंघातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण असून, संजय देरकर यांच्या प्रयत्नांमुळे वणी आगाराला नवीन बसेस मिळणार असल्याने जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
जनसेवेसाठी झटणारा व जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याकरिता ठाम भूमिका घेणारा आमदार म्हणून संजय देरकर यांच्याप्रती जनतेत समाधानकारक व विश्वासाचं वातावरण निर्माण झालं असून तसे स्पष्ट भावही जनतेतून उमटू लागले आहेत.
No comments: