(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार
प्रशांत चंदनखेडे वणी
मालवाहू ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना वणी वरोरा महामार्गावरील संविधान चौक येथे ५ फेब्रुवारीला सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. गणेश हरिचंद्र बदकी (२९) रा. मारेगाव असे या अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अपघाताच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. अपघातात निष्पाप जीवांचे बळी जाऊ लागले आहेत. वणी वरोरा महामार्गावरील संविधान चौकात मालवाहू ट्रकने (CG ०४ PH ०५२०) दुचाकीला (MH २९ AB १५६३) जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. अपघात झाल्यानंतर वाहन चालक हा वाहनासह पोलिस स्टेशनमध्ये स्वतःहून हजर झाला. दुचाकी चालक गणेश बदकी हा मारेगाव येथील रहिवाशी असल्याचे सांगण्यात येत आहे. तो काही काम निमित्त चंद्रपूरला गेला होता. चंद्रपूर वरून वरोरा मार्गे मारेगाव येथे जात असतांना त्याच्या दुचाकीला वरोरा मार्गावरील संविधान चौकात भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. यात गणेश बदकी या दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. घटनेचा प्राथमिक तपास जमादार संतोष आढाव करीत आहे.
Comments
Post a Comment