प्रशांत चंदनखेडे वणी
केदारनाथ जवळ झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत वणी येथील प्रसिद्ध कोळसा व्यावसायिक राजकुमार जयस्वाल, त्यांची पत्नी व दोन वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची व्ह्रदयद्रावक घटना रविवारी पहाटे ५.२० वाजताच्या सुमारास घडली. केदारनाथ वरून गौरीकुंड येथे जाण्याकरिता उडान भरलेले हे हेलिकॉप्टर गौरीकुंड जंगलात कोसळले. या अपघातात जयस्वाल पती पत्नी व मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर दुर्घनाग्रस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. आर्यन एव्हिएशन कंपनीचे हे हेलिकॉप्टर होते.
शहरातील प्रसिद्ध कोळसा व्यावसायिक व कोल ट्रान्सपोर्टर राजकुमार जयस्वाल हे आपल्या कुटुंबासह केदारनाथ येथे दर्शनाला गेले होते. केदारनाथ येथे दर्शन घेतल्यानंतर केदारनाथ मंदिरातून भाविकांना घेऊन गौरीकुंडला जात असलेल्या हेलीकॉप्टरचा भीषण अपघात झाला. केदारनाथ जवळील गौरीकुंड जंगलात हे हेलीकॉप्टर कोसळले. या भीषण अपघातात पायलटसह ७ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. उत्तराखंड नागरी विमान वाहतूक प्राधिकरण (UCADA) नुसार यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, गुजरात येथील प्रवाशांचा समावेश आहे.

या हेलिकॉप्टर मधुन प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील रविनगर येथे राहणाऱ्या प्रसिद्ध कोळसा व्यापारी व कोळसा वाहतूकदार राजकुमार सुरेश जयस्वाल (४१), श्रद्धा राजकुमार जयस्वाल व काशी राजकुमार जयस्वाल (२ वर्ष ३ महिने) या एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. राजकुमार जयस्वाल हे अतिशय सुस्वभावी व मनमिळाऊ स्वभावाचे होते. धार्मिक कार्यात ते नेहमी अग्रेसर राहायचे. वणी येथे शिवमहापुराण कथा आयोजनात त्यांची मुख्य भूमिका होती. त्यांचा असा हा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबं व मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्यांच्यासह त्यांच्या परिवारावर दुर्दैवी मृत्यू ओढावल्याने शहरात शोककळा पसरली आहे.
शहरात शिवमहापुराण कथेचं केलं होतं भव्य आयोजन
कोळसा व्यवसाय व कोल ट्रांसपोर्टींग क्षेत्रात प्रचलित असलेले राजकुमार जयस्वाल हे धार्मिक कार्यातही तेवढेच अग्रेसर होते. त्यांनी स्वतः पुढाकार घेत वणी येथे प्रथमच शिवमहापुराण कथेचं भव्य आयोजन केलं होतं. प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा वणी येथे आयोजित करून त्यांनी वणी तालुक्याचं नावलौकिक उंचावण्याचं महत्वपूर्ण कार्य केलं होतं. प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा घेऊन त्यांनी शहरात धार्मिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या आदल्या दिवशी केला होता एका व्यावसायिकाला फोन
येथीलच ट्रांसपोर्ट व्यावसायिक व सर्व प्रकारच्या टायरचे होलसेल विक्रेते जगबीर पुनिया यांना राजकुमार जयस्वाल यांनी शनिवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास फोन करून ट्रकला दोन नवीन टायर देण्यास सांगितले होते. त्याचवेळी त्यांनी ते उत्तराखंडला आल्याचे सांगतानाच तीन ते चार दिवसांत परत येणार असल्याचे त्यांनी जगबीर पुनिया यांच्याशी फोनवर संवाद साधतांना म्हटले. राजकुमार जयस्वाल यांनी जगबीर पुनिया यांच्याशी फोन वरून साधलेला तो संवाद शेवटचा ठरला. रविवारी पहाटे ५.२० वाजताच्या सुमारास राजकुमार जयस्वाल व त्यांचा परिवार हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यूमुखी पडल्याची वार्ताच नंतर जगबीर पुनिया यांच्या कानावर पडली.
त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकही गेले होते उत्तराखंडला
राजकुमार जयस्वाल यांच्या सोबत त्यांचे साडू आणि त्यांचं कुटुंबं देखील उत्तराखंडला देवदर्शनासाठी गेलं होतं. उत्तराखंड वरून हेलिकॉप्टरचं रिझर्वेशन करतांना राजकुमार जयस्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा जयस्वाल व चिमुरडी काशी जयस्वाल यांची नावे प्रथम आल्याने ते आधी हेलिकॉप्टरमध्ये बसले व केदारनाथ वरून गौरीकुंडच्या प्रवासाला निघाले. देवदर्शनाने मन प्रसन्न होऊन मुखावर आनंद दरवळत असतांना मार्गात दबा धरून बसलेल्या नियतीने आपला डाव साधला. केदारनाथ वरून उडाण भरलेले हे हेलिकॉप्टर एकाएक गौरीकुंड जंगलात कोसळले. आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं. काळाच्या ओघात एक हसतं खेळतं कुटुंबं गडप झालं. काळ आडवा आला आणि हेलिकॉप्टर क्रॅश होऊन एक दोन वर्षाची चिमुरडी व तिचे आई वडील काळाच्या पद्याआड गेले.
माजी आमदार बोदकुरवार, भाजप कार्यकर्ते व मित्रमंडळींनी त्यांच्या निवासस्थानाला दिली भेट
राजकुमार जयस्वाल व त्यांचा परिवार हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडल्याची वार्ता शहरात पसरल्यानंतर माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी त्यांच्या निवासस्थानाला भेट दिली. तसेच भाजप कार्यकर्ते व मित्रमंडळीही त्यांच्या निवासस्थानाजवळ जमली होती. मात्र त्यांच्या निवासस्थानाला कुलूप लागले असल्याने सर्व जण त्यांच्या निवसस्थानाबाहेर बसले होते. त्यांचे काही जवळचे नातेवाईक त्यांच्याशी अबोला धरून असल्याने ते तेथे हजर नव्हते. राजकुमार यांच्या आईचे निधन झाल्याचे समजते. त्यांना पहिल्या पत्नी पासून दोन मुले आहेत. तीही लहान आहेत. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे माहेर पांढरकवडा येथील आहे. तर एसीएस ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक असलेले त्यांचे नातेवाईक हेलिकॉप्टर दुर्घटनेची माहिती मिळताच उत्तराखंडला रवाना झाले. त्यामुळे मित्रमंडळीच त्यांच्या निवासस्थानाबाहेर बसून शोक संवेदना व्यक्त करतांना दिसले.
No comments: