वर्धा नदीत आंघोळ करण्याकरिता गेलेले तीन तरुण बुडाले, दोघांचे मृतदेह आढळले तर एकाचा अद्यापही लागला नाही शोध
प्रशांत चंदनखेडे वणी
महाशिवरात्री निमित्त वरोरा तालुक्यातील भटाळी येथे महादेवाच्या दर्शनाकरिता गेलेले काही तरुण परतीच्या प्रवासात वर्धा नदीत आंघोळ करण्यासाठी गेले असता त्यातील तीन तरुण नदीत बुडाल्याची दुर्दैवी घटना काल 8 मार्चला दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली. काल रात्री त्यांचा नदी पात्रात शोध घेतला असता ते आढळले नव्हते. आज सकाळी 9.30 वाजता परत शोधमोहीम राबविण्यात आली. चंद्रपूर येथून रेस्क्यू टीम बोलाविण्यात आली. त्यांनी बोटीच्या साहाय्याने नदी पात्रात तरुणांचा शोध घेतला असता सकाळी 11.45 वाजता संकेत पुंडलिक नगराळे (२७) याचा मृतदेह आढळून आला. तर काही वेळातच अनिरुद्ध सतिश चाफले (२२) या तरुणाचा मृतदेह आढळून आला. दोघेही शहरातील विठ्ठलवाडी येथील रहिवासी आहेत. त्यांच्यासह नदीत बुडालेला हर्षल अतिश चाफले (१७) हा तरुण मात्र अद्याप गवसला नाही. रेस्क्यू पथकाकडून या तरुणाचा नदी पात्रात युद्ध पातळीवर शोध घेण्यात आला.
विठ्ठलवाडी परिसरातील १० ते ११ तरुण महाशिवरात्री निमित्त भटाळी येथे भरणाऱ्या जत्रेत गेले होते. तेथून परतांना त्यांना मार्गातील वर्धा नदीवर आंघोळ करण्याचा मोह अनावर झाला. आणि हे तरुण वर्धा नदीत आंघोळीकरिता गेले. नदीपात्रात उतरल्यानंतर त्यांना पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्याने त्यांच्या पैकी काही तरुण खोल पाण्यात गेले, व नदीत बुडाले. आज रेस्क्यू पथकाला पाचारण करून सकाळी ९.३० वाजता पासून नदी पात्रात या तरुणांचा शोध घेण्यात आला. रेस्क्यू पथकाच्या अथक प्रयत्नानंतर सकाळी ११.४५ वाजता संकेत नागराळे व अनिरुद्ध चाफले या तरुणांचे मृतदेह आढळून आले. तर हर्षल चाफले या तरुणाचा अद्यापही शोध लागलेला नाही. तहसीलदार निखिल धुळधर व ठाणेदार अनिल बेहरानी यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेतला. पोलिस पथक अद्यापही घटनास्थळी तळ ठोकून आहे. सायंकाळी उशिरापर्यंत तिसऱ्या तरुणाचा शोध न लागल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली आहे. उद्या परत या तरुणाचा शोध घेतला जाणार आहे.
Comments
Post a Comment