वर्धा नदी पात्रात बुडालेल्या तिसऱ्या तरुणाचाही आढळला मृतदेह
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी वरोरा मार्गावरील पाटाळा पुलाजवळ वर्धा नदी पात्रात बुडालेल्या तिसऱ्या तरुणाचाही आज १० मार्चला पहाटे नदी काठावर तरंगतांना मृतदेह आढळून आला. काल ९ मार्चला रेस्क्यू पथकाने नदी पात्रात सायंकाळपर्यंत युद्ध पातळीवर शोध घेऊनही नदीत बुडालेला हा तिसरा तरुण आढळून आला नव्हता. आज पहाटे नदी काठावर तरंगतांना त्याचा मृतदेह आढळून आल्याने नदीत बुडालेल्या तीनही तरुणांचे मृतदेह हाती लागले आहेत. ८ मार्चला हे तीनही तरुण वर्धा नदीत बुडाल्याची हृदयद्रावक घटना घडली होती. त्यानंतर त्यांचा नदी पात्रात शोध घेण्यात आला. पण ८ मार्च ते नदी पात्रात आढळून न आल्याने ९ मार्चला चंद्रपूर येथून रेस्क्यू पथक बोलाविण्यात आले होते. ९ मार्चला रेस्क्यू पथकाने नदी पात्रात शोध मोहीम राबविली असता सकाळी ११.४५ वाजता संकेत पुंडलिक नगराळे (२७) व अनिरुद्ध सतिश चाफले (२२) या दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले. परंतु हर्षल अतिश चाफले (१७) या तरुणाचा मात्र शोध लागला नव्हता. आज पहाटे त्याचा नदी काठावर तरंगताना मृतदेह आढळून आला. एकाच परिसरातील जिवलग मित्रांवर असा हा दुर्दैवी मृत्यू ओढावल्याने विठ्ठलवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे. काल दोन तरुणांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जण सागर उसळला होता.
विठ्ठलवाडी येथे राहणारे १० ते ११ मित्र चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरालगत असलेल्या भटाळी येथे महाशिवरात्री निमित्त भरणाऱ्या जत्रेत गेले होते. जत्रेतून परत येतांना मार्गात असलेल्या वर्धा नदीवर आंघोळ करण्याचा त्यांना मोह सुटला. पोहण्याचा सराव नसतांना ते खोल पाण्यात गेल्याने डोह असलेल्या ठिकाणी त्यांच्यापैकी तीन तरुण बुडाले. काही तरुण कसेबसे बाहेर पडले. नदीतील पाण्याच्या पातळीचा नादाज न आल्याने हर्षल चाफले हा तरुण नदी पात्रात गटांगळ्या खाऊ लागल्याने त्याचा चुलत भाऊ त्याला वाचविण्याकरिता गेला असता तोही नदीत बुडू लागला. दोघे बुडत असल्याचे पाहून संकेत नगराळे याने त्या दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. पण तिघांनाही पोहणे येत नसल्याने तिघेही नदीत बुडाले. ८ मार्चला ही दुर्दैवी घटना घडली. त्या दिवशी त्यांचा नदी पात्रात शोध घेतला पण ते आढळून आले नाही. ९ मार्चला रेस्क्यू पथक बोलाविण्यात आले. रेस्क्यू पथकाने नदी पात्रात शोध मोहीम राबविल्यानंतर संकेत नगराळे व अनिरुद्ध चाफले या तरुणांचे मृतदेह आढळून आले. मात्र हर्षल चाफले या तरुणाचा शोध लागत नव्हता. सायंकाळी उशिरा शोध मोहीम थांबविण्यात आली. आज पहाटे हर्षल याचा नदी पात्रात तरंगतांना मृतदेह आढळून आला. या तीन तरुणांच्या अशा या अकाली मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकाच कुटुंबातील दोन भावंडांवर काळाने झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment