राजूर (कॉ.) येथील तरुणाने पाटाळा येथील तरुणावर केला जीवघेणा हल्ला, सुरीने केले सपासप वार
प्रशांत चंदनखेडे वणी
जुन्या वैमनस्यातून एका तरुणावर सुरीने हल्ला चढविण्यात आल्याची घटना २६ एप्रिललला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. सुरीचे सपासप वार करण्यात आल्याने तरुणाचं पोट फाटलं असून पोटातील आतडे बाहेर निघाल्याने अत्यवस्थ स्थितीत त्याला आधी चंद्रपूर व नंतर नागपूर येथे हलविण्यात आले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून निर्दयीपणे सुरीचे वार करण्यात आल्याने बघणाऱ्यांच्याही अंगाचा थरकाप उडाला होता. तरुणावर अमानुषपणे सुरीचे वार करण्यात आल्याचे पाहून पोलिसांनी क्रूरतेचा कळस गाठलेल्या या नराधमाला अवघ्या काही तासांतच अटक केली. या घटनेला वेगळ्याच वादाची किनार असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. माजरी पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडली असून पाटाळा येथील रहिवाशी असलेल्या तरुणावर राजूर (कॉ.) येथील तरुणाने प्राणघातक हल्ला केल्याने त्यांच्यातील नेमका टोकाचा वाद कुठला हा प्रश्न निर्माण झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पाटाळा गावातील रहिवासी असलेल्या धीरज घानवडे (२४) याच्यावर राजूर (कॉ.) ता. वणी जि. यवतमाळ येथील रहिवाशी असलेल्या वेदांत शांताराम हिकरे (२२) याने सुरीचे सपासप वार करून अर्धमेले केले. वेदांतने धीरजला फोन करून वणी वरोरा मार्गावरील जगन्नाथ बाबा मंदिराजवळ बोलाविले. त्यावेळी वेदांतचा मित्र प्रज्वल शेंडे (रा. चिखलगाव) हा देखील त्याच्या सोबत होता. धीरज येताच वेदांतने काही न कळायच्या आत धीरजवर धारदार सुरीने सपासप वार केले. धीराजच्या मानेवर व पोटावर सुरीचे वार बसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. पोटावर सुरीचा घाव घातल्या गेल्याने धीरजचे पोट फाटून पोटातील आतडे बाहेर आले होते. त्याला अत्यवस्थ अवस्थेत आधी चंद्रपूर येथे तर नंतर नागपूर येथे हलविण्यात आले. त्याची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे सांगण्यात येते. आज काल मधेच धिरजच्या बहिणीचे लग्न असून तो लग्नाच्या तयारीत व्यस्त होता. वेदांतने त्याला बहाण्याने बोलावले व त्याचा घात केला. या घटनेला वेगळ्याच वादाची किनार असल्याचे ऐकायला मिळत आहे.वेदांतचे वडील शांताराम हे मटण विक्रीचा व्यवसाय करतात. वेदांत देखील आपल्या वडिलांना या व्यवसायात हातभार लावायचा. मात्र २६ एप्रिलला अचानक असे काय घडले की, तो बकरा हलाल करण्याचा सुरा घेऊनच धीरजला भेटायला गेला. आणि काही कळायच्या आतच त्याने धीरजवर सुरीने सपासप वार केले. धीरजवर सुरीचे वार केल्यानंतर तो आपल्या मित्राला सोबत न घेता एकटाच तेथून निघून गेला. अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून धीरजला रुग्णालयात हलविले. तसेच शीघ्र तपास चक्रे फिरवून आरोपीला राजूर (कॉ.) ता. वणी जि. यवतमाळ येथून अटक केली. वेदांतने नेमक्या कोणत्या वादातून हा जीवघेणा हल्ला केला याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. घटनेचा पुढील तपास माजरी व वरोरा पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment