Latest News

Latest News
Loading...

(BREAKING NEWS) भरधाव कारने दोन दुचाकी वाहनांना उडवले, दोन जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी


प्रशांत चंदनखेडे वणी :-

भरधाव कारने दोन दुचाकी वाहनांना उडविल्याची थरकाप उडविणारी घटना ११ फेब्रुवारीला रात्री ८.३० ते ९ वाजताच्या सुमारास वणी घुग्गुस मार्गावरील पुनवट गावापासून काही अंतरावर घडली. या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूर येथे हलविण्यात आले आहे. 
चंद्रपूर कडून सुसाट येणाऱ्या कारने पुनवट व वणीकडे येणाऱ्या दोन दुचाकी वाहनांना पुनवट गावापासून २०० मिटर अंतरावर मागून जोरदार धडक दिली. धडक एवढी जबर होती की, दुचाकीस्वार चेंडूसारखे उसळून दूरवर फेकल्या गेले. या भीषण अपघातात दुचाकीवरील विजय जनार्धन धोबे (४८) रा. गुरूनगर वणी व रवि मंगेश कोहळे (४०) रा. शास्त्री नगर वणी, ह.मु. पुनवट हे दोघे जागीच ठार झाले. तर गौरव महेंद्र निब्रड (१५) व महेंद्र तुळशीराम निब्रड (४०) दोघेही रा. पुनवट हे बापलेक गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी गौरव निब्रड याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूर येथे हलविण्यात आले आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या कार चालकाचे नाव मात्र कळू शकले नाही. दोन वर्षांपासून पुनवट राहत असलेला रवि मंगेश कोहळे हा रंगकाम करीत असल्याचे सांगण्यात येते. 
अपघाताची माहिती शिरपूर पोलिसांना मिळताच एपीआय धीरज गुल्हाने हे स्वतः पोलीस पथकासह घटनास्थळी पोहचले. अपघातातील जखमींना तात्काळ उपचारार्थ हलविण्यात आले. तर मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. या अपघातात घरातील कर्त्या पुरुषांचा नाहक बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मागून भरधाव येणाऱ्या सुसाट कारने चक्क दोन दुचाकींना धडक दिली. त्यामुळे कारचालक हा नशेत तर नव्हता, अशी चर्चा रंगली आहे. दुचाकीने घरी परतणाऱ्या युवकांना कारचालकाच्या भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालविण्यामुळे आपला जीव गमवावा लागला. घटनेचा पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.