बकरी हाकलल्याचा ‘गुन्हा’ इतका मोठा? १२ वीच्या विद्यार्थ्याला चौघांकडून बेदम मारहाण; कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
प्रशांत चंदनखेडे वणी :-
वणी शहरातील खरबडा नगर परिसरात क्षुल्लक कारणावरून गुंडगिरीचा कळस गाठल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. केवळ बकरी हाकलल्याच्या कारणावरून १२ वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थ्याला चौघांनी मिळून भरदिवसा बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असली तरी शहरात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य सचिन रामटेके (वय १८), रा. खरबडा नगर, हा शहरातील एका महाविद्यालयात १२ वीमध्ये शिक्षण घेत आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास किराणा दुकानातून घरी परतताना त्याला शेजाऱ्यांनी बकरी हाकलण्यास सांगितले. त्याने बकरीला हाकलून लावल्यानंतर काही वेळातच अकसर शेख (३५) याने त्याची कॉलर पकडून दुकानासमोर ओढत नेले व थपडा-बुक्क्यांनी मारहाण सुरू केली.
यानंतर इस्तार शेख (१८), मुस्ताक शेख (१९) व एक विधी संघर्षग्रस्त बालक असे तीन जण त्याठिकाणी आले, व या सर्वांनी मिळून विद्यार्थ्याला डोक्यावर आपटत लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. “पुन्हा बकरीला हात लावशील तर जिवंत सोडणार नाही,” अशी धमकीही देण्यात आल्याचा आरोप आहे. झालेल्या मारहाणीने विद्यार्थी प्रचंड घाबरला असून आरोपींपासून आपल्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याचे त्याने तक्रारीत म्हटले आहे.
भरदिवसा एका शिक्षण घेणाऱ्या मुलावर चार जणांनी मिळून हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बकरी हाकलल्याच्या किरकोळ कारणावरून एका मुलाला घरून ओढून आणत त्याला बेदम मारहाण करण्याइतपत गुंडप्रवृत्ती वाढली असून यांना कायद्याचा जराही धाक उरला नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कायदा हातात घेणाऱ्यांचे मनोबल एवढे वाढले कसे? असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होऊ लागला आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी पाळीव कुत्र्याला दगड मारल्याच्या वादातून एका कुटुंबाने वेकोली कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडली आहे. सतत वाढणाऱ्या अशा घटनांमुळे वणी शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी एका विधी संघर्षग्रस्त बालकासह चारही आरोपींवर बीएनएसच्या कलम ११५(२), ३५१(२)(३), ३(५) नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई झाली नाही तर भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात, असे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

No comments: