Latest News

Latest News
Loading...

वेकोलीच्या वणी नॉर्थ क्षेत्रात कंत्राटी कामगारांची लूट; मनसेचा आंदोलनाचा इशारा


प्रशांत चंदनखेडे वणी :-

वेकोलीच्या (WCL) वणी नॉर्थ क्षेत्रात कंत्राटी कामगारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण सुरू असून, केंद्र सरकारच्या किमान वेतन नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी केला आहे. कंत्राटदारांकडून कामगारांना धमकावून पगाराची रक्कम परत घेतली जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून, याप्रकरणी आठ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही फाल्गुन गोहोकर यांनी वेकोलिच्या क्षेत्रीय प्रबंधकांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

वणी नॉर्थ क्षेत्रातील अनेक कंत्राटदार कागदोपत्री कामगारांना संपूर्ण वेतन दिल्याचे दाखवतात. मात्र प्रत्यक्षात कामगारांच्या बँक खात्यात पगार जमा झाल्यानंतर त्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकी देत रोख किंवा ऑनलाईन स्वरूपात ठराविक रक्कम परत घेतली जाते. एवढ्यावरच न थांबता, “आम्हाला पूर्ण वेतन मिळाले आहे” असे जबरदस्तीने कबुली देणारे व्हिडिओ रेकॉर्डिंगही कामगारांकडून करून घेतले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार म्हणजे ‘आधुनिक गुलामगिरी’ असल्याचे मनसेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या गंभीर प्रकाराकडे वेकोलीतील कामगार अधिकारी व संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही गोहोकार यांनी केला आहे. कंत्राटदार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे गोरगरीब कामगारांच्या हक्कावर गदा येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मनसेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात शोषण करणाऱ्या कंत्राटदारांना तात्काळ काळ्या यादीत टाकावे, जबरदस्तीने पैसे वसूल करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, कामगारांकडून लुबाडलेली रक्कम व्याजासह परत करावी, तसेच कामगार अधिकारी, कंत्राटदार आणि मनसे प्रतिनिधी यांची तातडीने संयुक्त बैठक घ्यावी, अशा ठोस मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

“वेकोली प्रशासनाच्या नाकाखाली कामगारांची लूट सुरू आहे. आठ दिवसांत दोषींवर कारवाई झाली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने तीव्र आंदोलन छेडेल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला प्रशासन पूर्णतः जबाबदार राहील,” असा स्पष्ट इशारा फाल्गुन गोहोकार यांनी निवेदनातून दिला आहे.

या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, वेकोलीचे मुख्य महाप्रबंधक (नागपूर) तसेच कामगार आयुक्तांना पाठवण्यात आल्या असून, वेकोली प्रशासन यावर आता कोणती ठोस कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निदेवन देतांना फाल्गुन गोहोकार यांच्यासह विलन बोदाडकर, सुरज काकडे, धीरज बगवा, प्रवीण मांडवकर, सुरज लोंढे, गजानन बोन्डे, अमोल जेऊरकर तथा कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.