**शहरात मनोरुग्णांचा मुक्त संचार; नागरिक त्रस्त, प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह, युवासेना उपजिल्हा प्रमुखांनी दाखविलेल्या माणुसकीची सर्वत्र चर्चा
शहरात गेल्या काही दिवसांपासून मनोरुग्णांचा वावर लक्षणीयरीत्या वाढल्याने शहरवासीयांमध्ये कमालीचा मनःस्ताप निर्माण झाला आहे. शहरातील प्रमुख व वर्दळीच्या रस्त्यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी मनोरुग्णांचा मुक्त संचार सुरू असून त्यांच्या विचित्र हालचाली व लज्जा निर्माण करणाऱ्या कृत्यांमुळे नागरिकांवर शरमेने मान खाली घालण्याची वेळ आली आहे.
आज एक वेडसर युवक विवस्त्र अवस्थेत शहरातील रस्त्यांवरून मुक्तपणे फिरत असल्याने एकच गोंधळ उडाला. हा वेडसर युवक थेट पोलिस ठाण्याच्या आवारात घुसला. मात्र तेथून त्याला हुसकावून लावल्यानंतर तो तहसील कार्यालय परिसरातून मुख्य रस्त्यावर आला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण पसरले.
याच दरम्यान युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे हे त्या मार्गावरून जात असताना त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तात्काळ आपली गाडी थांबवली. आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांनी त्या वेडसर युवकाला एका सुरक्षित ठिकाणी बसवून आधी त्याला टॉवेल बांधून दिला. त्यानंतर नवीन कपड्यांची व्यवस्था करून त्याला कपडे घालून दिले. विशेष म्हणजे त्या युवकाच्या शरीरावर गंभीर जखमा आढळून आल्या. या संपूर्ण घटनेत अजिंक्य शेंडे यांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि माणुसकी शहरवासीयांसाठी दिलासादायक ठरली.
दरम्यान, शहरात हे मनोरुग्ण कुठून येतात किंवा त्यांना शहरात कोण आणून सोडतं, हे कळायला मार्ग नाही. काही दिवसांपूर्वी एका मनोरुग्णाने दगडफेक करत एका वकिलाच्या आलिशान कारची काच फोडली होती. एवढेच नव्हे तर तो दगड घेऊन नागरिकांच्या मागे धावत असल्याने मोठी दहशत निर्माण झाली होती. त्या वेळी पोलिसांनी पुढाकार घेत त्याला एका स्वयंसेवी संस्थेत दाखल केले. मात्र त्यानंतरही शहरातील मनोरुग्णांचा वावर कमी झाल्याचे दिसत नाही.
या वाढत्या प्रकारांमुळे रस्त्यांवरून मार्गक्रमण करणाऱ्या महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे नगरपालिकेने व प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी शहरवासीयांकडून होत आहे.
मनोरुग्णांबाबत केवळ हुसकावून लावण्याची भूमिका न घेता त्यांच्यावर योग्य उपचार व पुनर्वसनाची जबाबदारी प्रशासनाने स्वीकारावी, अशी अपेक्षा व्यक्त होत असताना, युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी दाखवलेली माणुसकी समाजासाठी आदर्श ठरत आहे.

No comments: