प्रशांत चंदनखेडे वणी :-
तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीविरोधात मारेगाव पोलिसांनी धडक कारवाई करत कुंभा–करनवाडी मार्गावर साखरा गावाजवळून विना परवाना वाळू वाहतूक करणारा टिप्पर पकडला. या कारवाईत पोलिसांनी 6 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
10 फेब्रुवारी 2026 रोजी मारेगाव पोलिस स्टेशनचे एएसआय दिंगाबर किनाके हे पोकॉ. शुभम उईके यांच्यासह शासकीय वाहनातून बिट परिसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना पहाटे 3.30 ते 4.00 वाजताच्या सुमारास कुंभा ते करनवाडी मार्गाने MH-29-T-1533 क्रमांकाचा पांढऱ्या-हिरव्या रंगाचा टिप्पर संशयास्पदरीत्या येताना आढळला.
पोलिसांनी करनवाडी फाट्याजवळ टिप्पर थांबवून पंचासमक्ष टिप्परची तपासणी केली असता, त्यामध्ये 4 ब्रास वाळू (रेती) आढळून आली. चालकाकडे रेती वाहतुकीचा परवाना मागितला असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे टिप्परमधून विना परवाना रेतीची चोरटी वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. पोलिसांनी वाळू भरलेला टिप्पर जप्त करून पोलिस स्टेशनला लावला. पोलिसांनी या धडक कारवाईत ४ ब्रास वाळू किंमत २० हजार रुपये व टिप्पर किंमत ६ लाख रुपये असा एकूण ६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी एएसआय दिंगाबर किनाके यांच्या लेखी तक्रारीवरून वाळूची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या ज्ञानेश्वर गणपतराव ठाकरे (वय 55, रा. कळंब) व सचिन दरने (वय 45, रा. हिवरा, ता. कळंब) यांच्याविरोधात बीएनएसच्या कलम 303(2), 49, मोटार वाहन कायदा कलम 130/177 तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 48 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कार्यवाही ठाणेदार श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनात एएसआय दिगांबर किनाके व पोकॉ शुभम उईके यांनी केली. घटनेचा पुढील तपास एएसआय दिगांबर किनाके व पोलिस शिपाई सागर दिपेवार पोलीस करत आहेत. अवैध वाळू वाहतुकीमुळे महसुलाचे मोठे नुकसान होत असून, पोलिसांची ही कारवाई रेती चोरीला चाप लावणारी व महसूल विभागाचे डोळे उघडणारी ठरली आहे.

No comments: