Latest News

Latest News
Loading...

माता रमाईची १२८ वी जयंती उत्साहात साजरी

प्रशांत चंदनखेडे वणी :-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, वणीच्या वतीने त्याग, समर्पण आणि संघर्षाचे प्रतीक असलेल्या माता रमाई आंबेडकर यांची १२८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास तसेच माता रमाई यांच्या प्रतिमेस मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मंचाचे पदाधिकारी बंडू कांबळे, संजय तेलंग, घनश्याम ठमके, प्रा. पुरुषोत्तम पाटील यांच्यासह नगरसेविका करुणा कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते. अभिवादनानंतर सामूहिक त्रिशरण, पंचशील घेण्यात आले. तसेच बुद्ध, धम्म आणि संघावर निष्ठा व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा. पुरुषोत्तम पाटील यांनी माता रमाई यांच्या जीवनकार्यावर सविस्तर प्रकाश टाकला. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत जन्म घेऊन, अल्पायुष्यातही रमाई यांनी सहन केलेले दुःख, कष्ट आणि त्याग अपूर्व असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळजवळील वनद गावात जन्मलेल्या रमाई यांचे लहान वयातच आई-वडिलांचे छत्र हरपले. त्यानंतर मुंबईत नातेवाईकांकडे राहून कष्टाची कामे करत जीवन जगत असतानाच त्यांचे वयाच्या नवव्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी लग्न झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक, शैक्षणिक व राजकीय चळवळींमध्ये सक्रिय असताना रमाई यांनी त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून संसार सांभाळला. महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह, पुणे करार, परदेशातील शिक्षण तसेच विविध आंदोलनांच्या काळात बाबासाहेबांवर आलेल्या संकटांची चिंता रमाई यांनी मुकाट्याने सहन केली. बाबासाहेबांच्या स्वागतासाठी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून त्यांनी केलेले त्याग आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत, असे प्रा. पाटील यांनी नमूद केले.

तसेच धारवड येथील हॉस्टेल मधील विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या सोन्याच्या बांगड्या देऊन धान्य खरेदी करण्याचा प्रसंग सांगत त्यांनी रमाईंच्या मायेचे आणि सामाजिक भानाचे उदाहरण दिले. अवघ्या ३७ वर्षांच्या आयुष्यात रमाई यांनी दिलेले योगदान अतुलनीय असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन बंडू कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन घनश्याम ठमके यांनी मानले. कार्यक्रमाला संजय तेलंग, रामदास कांबळे, पुंजाराम भादिकर, वसंत नगराळे, विजय नगराळे, कवडू जीवने, पुंडलिक पथाडे, अशोक पडवेकर, गंगाधर रामटेके, विवेक तेलंग, रवि कांबळे, दादाजी घडले यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.