प्रेम, संशय, खंडणी आणि खोट्या गुन्ह्याचा थरार ; मारेगाव तालुक्यात ‘रिअल लाईफ थ्रिलर’ची धक्कादायक कथा उघड
प्रशांत चंदनखेडे वणी :-
पती–पत्नीचं नातं विश्वास आणि प्रामाणिकपणावर उभं असतं. मात्र दोघांपैकी एकाचं पाऊल जरी चुकलं, तरी संपूर्ण वैवाहिक जीवनाची घडी विस्कटायला वेळ लागत नाही. मारेगाव तालुक्यातील एका गावात उलगडलेली ही घटना त्याचं जिवंत उदाहरण असून, अनैतिक संबंध आणि खंडणीच्या गंभीर आरोपांमुळे एक सुखी संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर पोहोचला आहे.
काही कथा चित्रपटात शोभून दिसतात… पण मारेगाव तालुक्यातील ही घटना मात्र प्रत्यक्ष जीवनातील असल्याने अधिकच अस्वस्थ करणारी ठरते. पतीचे कथित अनैतिक संबंध, पत्नीचा संयम व संसार वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न आणि अखेरीस खंडणीसाठी खोट्या गुन्ह्याचा वापर—या साऱ्यांनी एका कुटुंबाचे आयुष्यच ढवळून निघाले आहे.
मारेगाव तालुक्यातील रहिवासी असलेल्या सुरेखा (नाव बदलेले) यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पती योगी यांचे गावातीलच रंभा नामक महिलेसोबत गेल्या वर्षभरापासून संबंध असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. परंतु संसार मोडू नये, मुलांचे भविष्य अंधारात जाऊ नये, या भावनेतून त्यांनी मौन बाळगले. मात्र पतीच्या वर्तनातील बदल, उशिरा घरी येणे आणि घराकडे होणारे दुर्लक्ष यामुळे त्यांचा संशय अधिकच बळावला. त्यामुळे त्यांनी पतीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.
जानेवारी २०२५ मध्ये पती ड्युटीवरून घरी न परतल्याने पत्नी संशयाने अस्वस्थ झाली. मुलीसह ती थेट संबंधित महिलेच्या घरी पोहोचली. तेथे पती त्या महिलेच्या घरातून बाहेर येताना दिसले आणि त्या क्षणी सगळे उघड झाले. त्यानंतर पत्नीने महिलेची चांगलीच कानउघाडणी केली. हा दोन लेकरांचा बाप आहे, याची तरी जाणीव ठेव असे तिने महिलेला ठणकावले. मात्र महिलेने निर्लज्जपणे “तो मला हवा आहे, पाच लाख रुपये दे… अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करीन” अशी थंड डोक्याने धमकी दिल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे.
पत्नीने अपमान गिळून पतीला घरी आणले. पण कथानक इथेच संपले नाही. सतत फोन, ऑफिसमधील इतर कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवरून संपर्क, दबाव आणि धमक्यांचा सिलसिला सुरूच राहिला. जानेवारी २०२६ मध्ये या प्रकरणाने आणखी वळण घेतले. संबंधित महिलेचा भाऊ सतीश याने थेट फिर्यादीच्या मुलाला फोन करून, तुझ्या वडिलांविरुद्ध बलात्काराची तक्रार द्यायची नसेल तर “पाच लाख रुपये द्यावे लागतील,” अशी उघड मागणी केल्याचा आरोप आहे.
या दबावामुळे त्रस्त झालेल्या पतीने नंतर स्वतः महिलेला भेटून पाच लाख रुपये देणे शक्य नसल्याचे सांगत तक्रार करू नये अशी विनवणी केली. मात्र त्याचा काहीही उपयोग न झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अखेर पैसे न मिळाल्याने संबंधित महिलेने पतीविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केल्याचा आरोप पत्नीने केला आहे.
या प्रकारानंतर पत्नी सुरेखानेही मौन सोडत मारेगाव पोलीस ठाणे गाठले. रंभा व तिच्या भावाविरोधात ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली. सुरेखाच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघाही बहीण भावाविरुद्ध बीएनएसच्या कलम ३०८ (३), ३(५) अन्वये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.
प्रेम, संशय, लोभ आणि कायद्याचा गैरवापर—या साऱ्यांचा हा गुंतागुंतीचा खेळ आता न्यायाच्या कसोटीवर असून, सत्य कोणाच्या बाजूने उघड होते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

No comments: