Latest News

Latest News
Loading...

पाळीव कुत्र्याला दगड मारल्याच्या वादातून युवकाचे फोडले डोके

प्रशांत चंदनखेडे वणी :-

पाळीव कुत्र्याच्या भुंकण्यावरून निर्माण झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. अंगावर भुंकणाऱ्या पाळीव कुत्र्याला दगड मारल्याच्या शुल्लक कारणावरून मायलेकांनी थेट एका युवकावर हल्ला चढविला. मुलाने दगड मारून युवकाचे डोके फोडले. तर आई व मुलीने युवकाला थापडा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना ३ फेब्रुवारीला रात्री १०.३० वाजताच्या सुमारास इंदिरा चौक, बेलदारपुरा परिसरात घडली. या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

इंदिरा चौक परिसरात राहणारे वेकोलि कर्मचारी मोहम्मद नजीम अब्दुल वहाब शेख (वय 40) हे 3 फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घराबाहेर फिरण्यासाठी निघाले. ते मंजुळा (नाव बदललेले) यांच्या घरासमोरून जात असतांना पाळलेल्या कुत्र्याने त्यांच्या अंगावर जोरजोरात भुंकण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांनी घाबरून कुत्र्याला हाकलण्यासाठी एक लहानसा दगड कुत्र्याच्या दिशेने भिरकावला; मात्र तो कुत्र्याला लागला नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या कारणावरून मंजुळा (वय अंदाजे 45) त्यांचा मुलगा (१९) व मुलगी (२१) हे तिघेही फिर्यादीच्या अंगावर धावून गेले. मुलाने हातातील दगड मोहम्मद नजीम यांच्या डोक्यावर मारल्याने त्यांचे डोके फुटून ते जखमी झाले. तसेच मायलेकींनी त्यांच्यावर हल्ला चढवून हाताबुक्यांनी जबर मारहाण केली. एवढेच नाही तर मोहम्मद नजीम यांना त्यांनी जीवे मारण्याची देखील धमकी दिल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे.

या घटनेनंतर जखमी मोहम्मद नजीम यांनी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मंजुळा आणि त्यांचा मुलगा व मुलीवरुद्ध बीएनएसच्या कलम 115(2), 118(1), 3(5), 351(2)(3) नुसार गुन्हा दाखल केला आहे. शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात पाळीव कुत्र्यांवर योग्य नियंत्रण नसल्याने अशा घटना घडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

पाळीव कुत्रे कोणावरही भुंकणार नाहीत अथवा चवताळून धावणार नाहीत, याची खबरदारी घेणे कुत्रे पाळणाऱ्यांची जबाबदारी आहे. मात्र या घटनेत क्षुल्लक कारणावरून थेट दगडाने हल्ला झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

No comments:

Powered by Blogger.