Latest News

Latest News
Loading...

नेरड (पुरड) ग्रामपंचायतीतील वादाला नवे वळण, सरपंच कार्तिका कुचनकर यांची मुकुटबन पोलीस ठाण्यात उलट तक्रार

प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नेरड (पुरड) ग्रामपंचायतीच्या महिला ग्रामसेवक कु. शालीनी कुमरे यांना मारहाण व जातीवाचक शिवीगाळ करण्यात आल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. संबंधित घटनेप्रकरणी आता नेरड गावाच्या सरपंच कार्तिका दिलीप कुचनकर यांनी देखील ग्रामसेविका व उपसरपंचाविरोधात मुकुटबन पोलीस ठाण्यात उलट तक्रार दाखल केली आहे.

सरपंच कार्तिका कुचनकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी ग्रामसभा कोरमअभावी रद्द करून ती 31 जानेवारी रोजी घेण्याचे ठरले होते. त्यानुसार सरपंच कार्तिका कुचनकर या 31 जानेवारीला सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात गेल्या असता तेथे ग्रामसेविका व उपसरपंच आधीच हजर होते. सरपंच कार्तिका यांनी ग्रामसेविकेला तुम्ही माझा फोन का उचलत नाही, असे विचारले असता ग्रामसेविका चांगल्याच भडकल्या. नंतर या कारणावरून ग्रामसेविकेने मोठा वाद घातला. 

कार्तिका कुचनकर यांनी ग्रामसेविकेला समजविण्याचा प्रयत्न केला, पण त्या काही एक ऐकायला तयार नव्हत्या. फोन न उचलल्याबाबत विचारणा केल्यावरून झालेला वाद नंतर चांगलाच पेटला. मात्र कार्तिका यांनी मी सरपंच व ग्रामसभेची अध्यक्षा असल्याने कार्यालयीन कामकाजाबाबत विचारणा करण्याचा मला पूर्णतः अधिकार आहे, असे म्हटल्यानंतर ग्रामसेविका थेट त्यांच्या अंगावर धावून आल्या, आणि अश्लिल भाषेत शिवीगाळ करून थापडाने मारहाण केल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे.

या वेळी उपसरपंच संतोष कुचनकर यांनीही अश्लिल शब्द वापरून चिथावणी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. भांडण वाढताच गावातील विठ्ठल महादेव लेडांगे व सतीश विठ्ठल झाडे यांनी हस्तक्षेप करून वाद सोडविल्याचेही सरपंचांनी तक्रारीत म्हटले आहे.

तसेच ग्रामसेविकेकडे जॉईन्ड लेटर पॅड मागितला असता तो देण्यास नकार देण्यात आला. यानंतर त्यांच्या मोठ्या मुलाला गंभीर गुन्ह्यात अडकविण्याची व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही सरपंचांनी तक्रारीत केला आहे.

सरपंच कार्तिका कुचनकर यांनी ग्रामसेविका कु. शालीनी कुमरे व उपसरपंच संतोष कुचनकर यांनी संगनमत करून सार्वजनिक ठिकाणी अश्लिल शिवीगाळ, मारहाण व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची तक्रार पोलीस स्टेशनला नोंदविली आहे. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी ग्रामसेविका व उपसरपंच यांच्यावर बीएनएसच्या कलम 132, 296, 115(2), 351(2), 3(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, याच प्रकरणात यापूर्वी ग्रामसेविका कु. शालीनी कुमरे यांनीही सरपंच व इतरांविरोधात तक्रार दाखल केल्याने, हा वाद आता दोन्ही बाजूंच्या तक्रारींमुळे अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. मुकुटबन पोलीस पुढील तपास करीत आहेत.

No comments:

Powered by Blogger.