प्रशांत चंदनखेडे वणी :-
वेकोलिच्या घोन्सा कोळसाखाणीत कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकाचा पुलाचे बांधकाम सुरु असलेल्या खोल खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ४ फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास घडली. घोन्सा मार्गाचे नव्याने बांधकाम सुरु असून नाल्यावर पूल उभारले जात आहे. कुंभारखनी डब्ल्यूसीएल ऑफिस समोरील एका नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरु असून रात्री कर्तव्यावरून परतणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा याठिकाणी खोल खड्ड्यात पडून मृत्यू झाला. यशपाल बुरबुरे (४३) असे या अपघाती मृत्यू झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.
यशपाल बुरबुरे हे घोन्सा कोळसाखाणीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. ते डब्ल्यूसीएल क्वार्टरमध्ये राहायचे. रात्री कोळसाखाणीतील आपले कर्तव्य आटपून ते डब्ल्यूसीएल क्वार्टरकडे परतत असतांना कुंभारखनी डब्ल्यूसीएल ऑफिस समोरील नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरु असलेल्या खोल खड्ड्यात पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पायदळ क्वार्टरकडे येत असतांना पुलाचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणाचा अंदाज न आल्याने ते खोल खड्ड्यात पडले व यात त्यांचा जागीच मृत्यू झाला, असा अंदाज बांधण्यात येत आहे.
यशपाल बुरबुरे हे मितभाषी स्वभावाचे होते. मूळचे ते राजूर कॉलरी येथील रहिवाशी होते. नंतर ते वणी येथे स्थायिक झाले. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे अनेक जण त्यांच्याशी जुळले होते. सर्वांशीच त्यांचे सलोख्याचे संबंध होते. पुरोगामी विचारांचे ते पाईक होते. त्यांच्या अपघाती निधनाने कुटुंब व आप्तस्वकीयांवर दुःखाचा पहाड कोसळला आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पुढील तपास पोलीस करीत आहे.


No comments: