प्रशांत चंदनखेडे वणी
मोटारसायकल अपघातात वणी नगर परिषदेचे माजी नगरसेवक राजू उर्फ राजेश वामनराव डफ (५२) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ४ फेब्रुवारीला दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास झरी तालुक्यातील मुच्ची गावाजवळ घडली. राजू डफ हे रस्त्याच्या कडेला दुचाकीसह पडून असल्याचे आढळून आल्यानंतर ही माहिती पाटण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता झरी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. राजू डफ हे झरी वरून वणीला परतत असतांना मुच्ची गावाजवळील वळण रस्त्यावर त्यांच्या मोटारसायकलला भीषण अपघात झाला. आणि यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
शहरातील रंगारीपुरा येथे राहणारे राजू डफ हे झरी येथे काही कामानिमित्त गेले होते. झरीवरून वणीला परतत असतांना मुच्ची गावाजवळ त्यांच्या दुचाकीला (MH २९ AS १८५६) भीषण अपघात झाला आणि या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. राजू डफ हे वणी नगर परिषदेचे माजी नगरसेवक होते. यावेळीही त्यांनी नगरसेवक पदासाठी निवडणूक लढविली होती. राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या राजू डफ यांच्या अपघाती मृत्यूने शहरात शोककळा पसरली आहे.
सुस्वभावी व मनमिळाऊ असलेल्या राजू डफ यांचे सर्वांशीच सलोख्याचे संबंध होते. त्यांच्यावर असा हा अकाली मृत्यू ओढावल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काळाने घाला घातला आणि एक सज्जन व्यक्ती काळाच्या पद्याआड गेल्याच्या शोकसंवेदना शहरवासियांमधून व्यक्त होत आहेत. मोटारसायकल स्लिप होऊन किंवा वळण घेतांना मोटारसायकल वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा कयास वर्तविण्यात येत आहे. घटनेचा पुढील तपास पाटण पोलीस करीत आहे.

No comments: