Latest News

Latest News
Loading...

विद्यार्थ्यांना सर्वोत्तम ज्ञान देण्यासाठी शिक्षकांनी अद्ययावत राहणे गरजेचे – विद्या आत्राम


प्रशांत चंदनखेडे वणी :-

२१ वे शतक हे प्रचंड स्पर्धेचे असून क्षणोक्षणी ज्ञानाचा विस्फोट होत आहे. अशा परिस्थितीत नगर परिषद शाळांमधील विद्यार्थी स्पर्धेत कुठेही मागे राहू नयेत, यासाठी शिक्षकांनी स्वतः सतत अद्ययावत राहून आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे असलेले सर्वोत्तम ज्ञान देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वणी नगर परिषदेच्या अध्यक्षा विद्या आत्राम यांनी केले.

त्या नगर परिषद शिक्षण विभागाच्या वतीने नगर परिषद शाळा क्रमांक ७ येथे आयोजित शिक्षण परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न.प. शिक्षण सभापती सोनाली निमकर होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर चांदेकर उपस्थित होते.

प्रशासन अधिकारी गजानन कासावार यांनी आपल्या प्रास्ताविकातून शिक्षण परिषदेच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत शिक्षकांकडून असलेल्या अपेक्षांचे सविस्तर विवेचन केले. अध्यक्षीय भाषणात शिक्षण सभापती सोनाली निमकर यांनी शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन देत शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याबाबत आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या.

यानंतर सुलभक म्हणून शाळा क्रमांक ७ च्या शिक्षिका शुभांगी वैद्य यांनी ‘निपुण महाराष्ट्र’ अंतर्गत ‘लीडर माता–पालक’ या विषयावर मार्गदर्शन केले. दिगंबर ठाकरे यांनी ‘मूल्यसंवर्धन’ या विषयावर विचार मांडले. शाळा क्रमांक ८ चे शिक्षक अविनाश तुंबडे यांनी डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी उपक्रमाबाबत मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी कशी करावी याचे प्रात्यक्षिकाद्वारे स्पष्टीकरण दिले. तसेच अध्ययन स्तर नोंदणीबाबत आढावा घेऊन आवश्यक सूचना करण्यात आल्या.

यावेळी शिक्षकांना प्रत्यक्ष अध्यापन करताना येणाऱ्या अडचणींवर सखोल चर्चा करून त्यावर उपाय सुचविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्र समन्वयक चंदू परेकर यांनी तर आभार प्रदर्शन विजय चव्हाण यांनी केले.
या शिक्षण परिषदेला नगर परिषद शाळांचे सर्व मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.