Latest News

Latest News
Loading...

ग्रामपंचायत कार्यालयात महिला ग्रामसेविकेवर हल्ला; जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप


प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी तालुक्यातील नेरड (पु) येथील ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय कामकाज सुरू असताना महिला ग्रामपंचायत अधिकारी कु. शालिनी उत्तमराव कुमरे यांच्यावर बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण, धक्काबुक्की व जातीवाचक शिवीगाळ केल्याची गंभीर घटना 31 जानेवारी 2026 रोजी घडल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या प्रकरणी कु. शालिनी कुमरे (वय 49) यांनी १ फेब्रुवारीला मुकुटबन पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार दाखल केल्याने ग्रामपंचायत सरपंच कार्तिका दिलीप कुचनकर, त्यांचे कुटुंबीय व इतरांविरुद्ध शासकीय कामात अडथळा, मारहाण, धमकी व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांच्या तक्रारीनुसार, 31 जानेवारी रोजी सकाळी नेरड (पु) ग्रामपंचातीची ग्रामसभा असल्याने त्या ग्रामसभेत उपस्थिती दर्शविण्याकरिता गेल्या होत्या. दरम्यान कु. शालिनी कुमरे या बैठकीच्या कामासाठी ग्रामपंचायत कार्यालयात प्रोसिडींगचे काम करीत असताना गाव नमुना 8 (अ) मागणीवरून वाद निर्माण झाला. ऑपरेटर हजर नसल्याने त्यांनी संबंधित कागदपत्र नंतर देण्याचे सांगितले असता सरपंच व त्यांच्या नातेवाईकांनी जोरजोरात वाद घालत अपशब्द वापरले. याच दरम्यान निलेश कुचनकर यांनी थेट अंगावर धावून येत प्रोसिडींग रजिस्टर खाली फेकल्याचा आरोप आहे.

यावेळी आरोपींनी त्यांच्या जातीचा उल्लेख करत जातीवाचक व अश्लील शिवीगाळ केली तसेच त्यांना कार्यालयातून बाहेर ओढून त्यांच्याशी झटापट केल्याने कु. कुमरे यांच्या डाव्या पायाला दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. उपसरपंचांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सरपंच कार्तिका दिलीप कुचनकर, दिनेश दिलीप कुचनकर, निलेश दिलीप कुचनकर, पल्लवी दिनेश कुचनकर व प्रियंका निलेश कुचनकर यांच्यावर बीएनएसच्या कलम 189(2), 190, 132, 121(1), 296, 351(), 352, 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(va) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ तालुका ग्रामसेवक संघटनेने वणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) यांना निवेदन देत तीव्र भूमिका घेतली आहे. संघटनेने नमूद केले आहे की, सदर प्रकरणात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई वा अटक झालेली नाही, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे आरोपींवर कायदेशीर कारवाई अथवा त्यांना अटक होईपर्यंत ३ फेब्रुवारी पासून असहकार आंदोलन तथा ५ फेब्रुवारी पासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा ग्रामसेवक संघटनेने निवेदनातून दिला आहे. 

महिला कर्मचारी, विशेषतः अनुसूचित जमातीतील अधिकारी यांच्यावर शासकीय कार्यालयातच होणारे असे हल्ले प्रशासनाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. या प्रकरणात पोलीस व प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे

No comments:

Powered by Blogger.