जेसीबीखाली चिरडले गेले स्वप्नांचे दुकान! अवस्थी चौकात अतिक्रमण हटाव मोहिमेने अनेक कुटुंबांचा जगण्याचा आधार हिरावला
अवस्थी चौक परिसरात सोमवारी दुपारी जेसीबीचा आवाज घुमला… पण तो फक्त टिनपत्रे तोडणारा आवाज नव्हता, तो अनेक कुटुंबांच्या जगण्याचा आधार, वर्षानुवर्षांची मेहनत आणि उद्याच्या आशा चिरडणारा आवाज होता. रस्त्याच्या कडेला फुटपाथलगत उभ्या असलेल्या चाय टपऱ्या, पान टपऱ्या, हॉटेल आणि गॅरेज जेसीबीच्या दणदणाटात जमीनदोस्त होत असताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते.
गेल्या २५ ते ३० वर्षांपासून सोनपूर टाकळी व अवस्थी चौक परिसरात लहान-सहान व्यवसाय करून आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे युवक या कारवाईने पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहेत. कुणाची चाय टपरी, कुणाचं पान दुकान तर कुणाचं छोटंसं हॉटेल… हे केवळ व्यवसाय नव्हते, तर त्यांच्या घरातील चुल पेटती ठेवणारे आधार होते.
अनेक युवकांनी कर्ज काढून टिनपत्र्यांची दुकाने उभी केली होती. सकाळपासून रात्रीपर्यंत दुकानांमध्ये राबून ते आपला संसार चालवत होते. मात्र २ फेब्रुवारी रोजी नागपूर महानगर पालिकेने कडेकोट पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम राबवित क्षणात सर्व दुकाने उद्ध्वस्त केली. या ठिकाणी लॉनसाठी पार्किंग तयार करण्यात येत असल्याने ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या संदर्भातील तक्रारीवरूनच ही मोहीम राबविण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
या कारवाईत सर्वाधिक वेदनादायक चित्र एका दिव्यांग युवकाच्या गॅरेजचे होते. पायाने अपंग असलेल्या या युवकाचे मोटारसायकल दुरुस्तीचे छोटेसे गॅरेज त्याच्या कुटुंबाचा एकमेव उदरनिर्वाहाचा आधार होते. अतिक्रमण हटाव मोहिमेत या दिव्यांग मेकॅनिकलचे गॅरेज हटविताच त्याच्या आयुष्याचा कणा मोडल्यासारखी अवस्था झाली. तो युवक सुन्न नजरेने आपले उद्ध्वस्त झालेले दुकान पाहत उभा होता.
या परिसरातील पान टपऱ्या, चाय टपऱ्या व लहान व्यवसायांवर किमान २५ ते ३० कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून होता. आता या कुटुंबांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. रोजगार हिरावल्या गेलेल्या युवकांचे भवितव्य अंधारात गेले असून ते चुकीच्या मार्गाकडे वळू नयेत, याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
विशेष म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या नागपूर महानगर पालिका निवडणुकीनंतर ही कारवाई करण्यात आली. मात्र या वेळी संबंधित प्रभागातील एकही नगरसेवक घटनास्थळी उपस्थित नव्हता. जेसीबी युवकांच्या स्वप्नांवर चालत असताना लोकप्रतिनिधींची अनुपस्थिती अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे.
अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे बेरोजगार झालेल्या युवकांच्या पुनर्वसनाचं काय, त्यांना पर्यायी रोजगार देणार का, हा प्रश्न आता सामाजिक कार्यकर्ते व सुज्ञ नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. याबाबत महानगर पालिका काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विकासाच्या नावाखाली गरिबांचा घास हिरावला जात असेल, तर असा विकास नेमका कुणासाठी, हा सवाल आता अवस्थी चौक परिसरात उपस्थित होत आहे.




No comments: