अंतरजिल्हा ड्रग्स तस्कर अटकेत; 9.82 लाखांचा मुद्देमाल जप्त; शिरपूर पोलिसांची जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई
प्रशांत चंदनखेडे वणी :-
जिल्ह्यात वाढत्या अंमली पदार्थांच्या तस्करीवर लगाम लावण्यासाठी शिरपूर पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत अंतरजिल्हा ड्रग्स तस्कराला अटक करण्यात आली असून त्याच्याजवळून तब्बल 9 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस स्टेशन स्तरावर जिल्ह्यात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे. ही धडाकेबाज कारवाई ११ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी ड्रग्स बाळगणाऱ्या व सेवन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर शिरपूर पोलिसांनी ड्रग्स माफियांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार शिरपूर पोलिसांना पुनवट (ता. वणी) येथे राहणारा व सध्या नागपूर येथे वास्तव्यास असलेला श्रेयश उर्फ गुड्डु शंशीकांत पाटील (वय 24) हा वणी-शिरपूर परिसरात एमडी (मेफेड्रोन) या सिंथेटिक ड्रग्सची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय व तेवढीच खात्रीदायक माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे शिरपूर पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करून चारगाव–वणी मार्गावर नाकाबंदी केली. दरम्यान पोलिसांना सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास चारगावकडून वणीकडे एक कार संशयितरित्या येतांना दिसली. पोलिसांनी या कारला (DATSUN GO+ क्र. MH 32 AH 4126) थांबवून कारची तपासणी व आरोपीची झडती घेतली असता आरोपी जवळ 57.1 ग्रॅम एमडी ड्रग्स (किंमत अंदाजे 5 लाख 60 हजार रुपये) आढळून आला. पोलिसांनी त्याच्या जवळील एमडी ड्रग्स जप्त करून त्याला अटक केली.
तसेच पोलिसांनी त्याच्या ताब्यातून ड्रग्स मोजण्यासाठी वापरले जाणारे 3 डिजिटल वजन काटे (15 हजार रुपये), एक मोबाईल (70 हजार रुपये) व तस्करीसाठी वापरण्यात आलेली आलिशान कार (4 लाख रुपये) असा एकूण 9 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मानवी आरोग्यास हानिकारक असलेल्या एमडी ड्रग्स या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या श्रेयश शशिकांत पाटील या आरोपीविरुद्ध पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून तस्करीच्या साखळीचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. वणी शहर व तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्स या महागड्या अमली पदार्थाची विक्री होत असल्याचे उघड झाल्यानंतर एमडी ड्रग्सची नशा करणाऱ्यांचीही तालुक्यात मोठी संख्या असल्याचे या कारवाई वरून समोर आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष मनवर, सपोनि धीरज गुल्हाने, सुरज साबळे, इकबाल शेख, प्रशांत झोड, पंकज कुडमेथे, परमेश्वर दराडे, किरण दासरवार, सुनिल दुबे यांनी केली.
जिल्ह्यातील ड्रग्स माफियांना कडक इशारा देणारी ही कारवाई असून ड्रग्स विक्री किंवा सेवनाबाबत माहिती असल्यास नागरिकांनी शिरपूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

No comments: