Latest News

Latest News
Loading...

रंगारीपुऱ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; सात जणांवर गुन्हा दाखल

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरातील रंगारीपुरा परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वणी पोलिसांनी धडक कारवाई करत गंजीपत्त्यावर पैशाचा जुगार खेळणाऱ्या सात जणांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलिसांनी 52 गंजी पत्ते व रोख रक्कमेसह एकूण 7 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दि. 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.35 ते 4 वाजताच्या सुमारास रंगारीपुरा येथील विवेक नारायण उके यांच्या राहत्या घरी काही जण पैशांच्या हारजीतचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सपोनि प्रियांका चौधरी यांच्या नेतृत्वात पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला.

तेथे विवेक नारायण उके (40), शेख रफिक शेख मेहबुब (41), अशोक नामदेव नागदिवे (68), गणपत भिकाजी वाढई (72), प्रकाश पुंडलीक कोंडमवार (50), सुमित सुभाषराव कोनप्रत्तीवार (30) व सिद्धार्थ विवेक चवरे (26) हे सातही जण 52 गंजी पत्त्यांवर पैशांचा जुगार खेळताना आढळून आले.

कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून 52 गंजी पत्ते व 1,650 रुपये रोख रक्कम जप्त केली. तसेच आरोपींची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळून अनुक्रमे 550, 1,020, 1,070, 500, 1,030, 500 व 900 रुपये अशी एकूण 7,220 रुपये रोख रक्कम मिळून आली. हा सर्व मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला.

या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सातही जुगाऱ्यांवर पोलिसांनी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 4 व 5 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास जमादार विशाल राठोड हे करीत आहेत.

दरम्यान, शहरात अवैध जुगार अड्ड्यांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला असून अशा प्रकारांविषयी माहिती असल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Powered by Blogger.