राजूर (कॉ.) येथील दीक्षा भूमीवर साजरा होणार ६८ वा धम्म दीक्षा सोहळा, विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचं करण्यात आलं आयोजन

प्रशांत चंदनखेडे वणी 

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांच्या उत्थानासाठी दिलेला लढा व सामाजिक समानतेसाठी केलेल्या संघर्षाची जाणीव ठेऊन राजूर या क्रांतिभूमीत त्यांच्या कार्याचा वसा पुढे नेत त्यांच्या विचारांची ज्योत तेवत ठेवण्याचं उत्तरदायित्व सतत जोपासलं जात आहे. बाबासाहेबांनी समतेसाठी केलेल्या क्रांतीचा वारसा राजूर या गावाने चळवळीच्या माध्यमातून पुढे नेला आहे. आणि म्हणूनच राजूर या गावाला चळवळीचं गाव म्हणून ओळखलं जातं. बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केल्यानंतर नागपूर येथे लाखो अनुयांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आणि येथूनच परिवर्तनाची लाट सुरु झाली. जागतिक पातळीवरही या क्रांतीचा आवाज गुंजला. या धम्म दीक्षेचे प्रतीक म्हणून उभारण्यात आलेली दीक्षाभूमी विश्वविख्यात ठरली आहे. बाबासाहेबांनी नागपूर व चंद्रपूर नंतर राजूर या गावाची धम्म दिक्षेसाठी निवड केली होती. पण त्यांच्या प्रकृतीने त्यांची साथ दिली नाही. पण त्यांनीं ठरविलेलं उद्दिष्ट मात्र पूर्ण झालं. २८ एप्रिल १९५७ ला बाबासाहेबांचे विश्वासू बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेत भदंत आनंद कौशल्यायन यांनी राजूर येथे भव्य धम्मदीक्षा समारंभातून हजारो अनुयानांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या धम्म दीक्षेचं प्रेरणास्थान म्हणजे राजूर (कॉ.) येथील दीक्षाभूमी आहे. राजूर येथील ही दीक्षाभूमी त्या धम्मक्रांतीचं प्रतीक असून याठिकाणी दरवर्षी धम्म दीक्षा दिन सोहळा साजरा करण्यात येतो. यावर्षीही दीक्षाभूमी येथे ऐतिहासिक धम्मदीक्षा दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. 

दीक्षा भूमी बुद्ध विहार कमेटी राजूर (कॉ.) च्या वतीने २८ एप्रिलला ६८ वा धम्म दीक्षा दिन सोहळा साजरा करण्यात येत असून या निमित्त विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता धम्मध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत महापरित्राण पाठ होणार आहे. सायंकाळी ५ वाजता धम्म भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ६ वाजता यशोगाथा महासूर्याची ही संगीतमय नाट्यकृती सादर करण्यात येणार आहे. यात बाल कलाकार संघ राजूरचा सहभाग असणार आहे. सायंकाळी ७ वाजता स्मरण "धाम्मदिक्षा सोहळ्याचे" हा भीम बुद्ध गीतांचा संगीतमय ऑर्केष्ट्ट होणार आहे. ६८ व्या धम्म दीक्षा सोहळ्या निमित्त भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून या सोहळ्याला जनतेने मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन दीक्षा भूमी बुद्ध विहार कमेटीच्या वतीने अध्यक्ष विवेक निमसटकर, उपाध्यक्ष पंकज कांबळे, सचिव जितकुमार चालखुरे, सहसचिव तथागत मस्के, कोषाध्यक्ष यशवंत पाटील यांनी केले आहे.  

 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी