वीटभट्टा मालक व मजुरात तुफान हाणामारी, चाकू हल्ल्यात अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी, दोघांच्याही परस्परविरोधी तक्रारी

प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरातील खडबडा मोहल्ला येथे वीटभट्टा मालक व मजुरात झालेल्या वादाचे पर्यवसान तुफान हाणामारीत झाले. शेजारी राहणाऱ्या दोन कटुंबांमध्ये प्रचंड राडा झाला. यात एका मुलावर चाकूने हल्ला करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. याबाबत दोघांनीही परस्परविरोधी तक्रारी नोंदविल्याने पोलिसांनी ४ जणांवर गुन्हे दाखल केले आहे. ही घटना २० एप्रिलला सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास घडली. घटनेची माहिती डीबी पथकाला मिळताच डीबी पथकाने तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेत आरोपींना अटक केली. 

या प्रकरणी पहिली तक्रार राहुल खेमराज मेश्राम (४०) रा. खडबडा मोहल्ला याने नोंदविली. त्याच्या तक्रारी नुसार त्याचा याच परिसरात वीटभट्टा आहे. त्याच्या घराशेजारी अनिल विनायक येमूलवार (२५) हा राहत असून तो राहुल मेश्राम याच्या वीटभट्यावर काम करतो. १५ दिवसांपूर्वी अनिलने राहुलचा भाऊ भूषण याच्याकडून ४ हजार रुपये घेतले होते. त्यानंतर त्याने कामावर येणे बंद केले. अनिल कामावर येत नसल्याने भूषण २० एप्रिलला सकाळी १० वाजता अनिलच्या घरी गेला. त्याने अनिलला कामावर का येत नाही अशी विचारणा केली असता त्याने कामावरही येत नाही व तुझे पैसेही देत नाही असे उलट उत्तर दिले. त्यानंतर भूषण हा माघारी परतला. दरम्यान सायंकाळी ५ वाजता राहुल, त्याचा मुलगा ओम व भाऊ भूषण हे घरी असतांना अनिल व व त्याचा भाऊ अजय येमूलवार हे दारू पियुन आले, व राहुलच्या घरासमोर उभे राहून जोरजोरात शिवीगाळ करू लागले. राहुल व भूषणने त्यांना शिवीगाळ का करता, असे विचारले असता अजयने भूषणच्या तोंडावर ठोशा मारला. भूषणला मारहाण होत असल्याचे पाहून राहुलचा १५ वर्षीय मुलगा मध्यस्थी करण्याकरिता गेला असता त्याच्यावरही चाकूने वार करण्यात आला. ओमच्या गळ्यावर चाकूचा वार बसल्याने तो गंभीर जखमी झाला असून भूषणचा दात पडला आहे. ओमची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. याबाबत राहुल मेश्राम याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अनिल व अजय येमूलवार या दोन्ही भावांवर भादंविच्या कलम ३०७, ३२३, ३२५, ४२७, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हे दाखल केले आहे. 

तर अनिल येमूलवार याने दिलेल्या तक्रारी नुसार त्याने काही दिवसांआधी वीटभट्यावर काम करतांना ४ हजार रुपये ऍडव्हान्स म्हणून घेतले होते. २० एप्रिलला सायंकाळी ५ वाजता तो ऍडव्हान्स घेतलेली रक्कम परत करण्यासाठी राहुलच्या घरी गेला होता. त्याने दोन हजार रुपये राहुलला परत केले. पण पूर्ण ४ हजार रुपयेही परत पाहिजे, या कारणावरून दोन्ही भावांनी अनिलशी वाद घातला. एवढेच नाही तर शिवीगाळ करून दोघांनी मारहाण देखील केली. याबाबत अनिल येमूलवार याने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी राहुल व भूषण मेश्राम या दोन्ही भावांविरुद्ध भादंविच्या कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.   

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी