योगेश ट्रेडर्स या सिमेंट स्टील गोदामात दरोडा टाकून करण्यात आली रखवालदाराची निर्घृण हत्या
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी यवतमाळ मार्गावरील पळसोनी फाट्याजवळ असलेल्या योगेश ट्रेडर्स या सिमेंट स्टील गोदामात अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून तेथे तैनात असलेल्या रखवालदाराचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना आज २९ एप्रिलला सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. रात्री ११ वाजता नंतर दरोडेखोरांनी गोदामात दरोडा टाकून रखवालदाराचा खून केल्याचा कयास वर्तविण्यात येत आहे. जीवन विठ्ठल झाडे (६२) रा, आष्टोना ता. राळेगाव असे या दरोडेखोरांनी हत्या केलेल्या रखवालदाराचे नाव आहे. दरोडेखोरांनी गोदामाच्या आवारात ठेऊन असलेली २४० किलो वजनाची चार सलाखीची बंडलं चोरी केल्याचे सांगण्यात येते. परंतु गोदामातून मोठ्या प्रमाणात सळाखी चोरी गेल्याचे बोलल्या जात आहे.
लालपुलिया परिसरात पळसोनी फाट्याजवळ योगेश ट्रेडर्सचे सिमेंट स्टील गोदाम आहे. सुरेश खिवंसरा यांच्या मालकीचे हे गोदाम असून येथे मोठ्या प्रमाणात लोखंडी सलाखीचा साठा करून ठेवण्यात आला आहे. मुख्य मार्गाच्या बाजूलाच हे गोदाम असलं तरी व्यावसायिक बाजारपेठ व लोक वस्ती पासून ते लांब आहे. रात्री हा भाग अतिशय सुनसान होतो. जिकडे तिकडे काळोख पसरलेला असतो. या गोदामाची रखवाली करण्याकरिता जीवन झाडे यांना ठेवण्यात आले होते. ते पत्नीसह तेथेच राहायचे. त्यांची पत्नी कालच काही कामानिमित्त मूळगावी गेली होती. वडकी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आष्टोना गावचे ते रहिवाशी होते. रविवार दि.२८ ला रात्री गोदामाची रखवाली करतांना अज्ञात दरोडेखोरांनी त्यांचा लोखंडी वस्तूने डोक्यावर व खांद्यावर प्रहार करून निर्घृण केला. तसेच या दरोडेखोरांनी लोखंडी सलाखीची चार बंडलं (२४० किलो किंमत १४ हजार रुपये) चोरून नेली. दोन सळाखीचे बंडल त्यांनी मुख्य मार्गापर्यंत आणून तेथेच सोडून दिले. गोदामातील सीसीटीव्ही कॅमेरे देखील दरोडेखोरांनी तोडले. घटनास्थळावर वाहनाच्या टायरचे निशाण असून मालवाहू वाहनातून सळाखी चोरी केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध दरोडा व खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
जीवन झाडे हे मागील अनेक वर्षांपासून या गोदामात रखवालदार म्हणून काम करायचे. ते व त्यांची पत्नी गोदामाजवळीलच एका खोलीत राहायचे. मालकाचे ते अतिशय विश्वासू होते. गोदामाची पूर्ण रखवाली त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. २८ एप्रिलला ते आपलं कर्तव्य बजावत असतांना अज्ञात दरोडेखोरांनी गोदामात दरोडा टाकला. गोदामाच्या आवारातील सळाखीची बंडलं चोरून नेतांनाच दरोडेखोरांनी लोखंडी वस्तूने प्रहार करून जीवन झाडे यांचा निर्घृण खून केला. रात्री ११ वाजता नंतर ही घटना घडली असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. एसडीपीओ गणेश किंद्रे, ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्यासह सपोनि गुल्हाने व पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. घटनेचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप यांनी देखील घटनास्थळाला भेट दिली. मुख्य मार्गावरील गोदामात दरोडा टाकून रखवालदाराचा खून करण्यात आल्याने शांतीप्रिय म्हणून ओळखला जाणारा वणी तालुका हादरला आहे. या घटनेचा छडा व रखवालदाराच्या मारेकऱ्यांचा शोध लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. तूर्तास या दरोडा व खुन प्रकरणाचा तपास शिरपूरचे ठाणेदार माधव शिंदे यांच्याकडे देण्यात आला आहे.
Comments
Post a Comment