आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू
प्रशांत चंदनखेडे वणी
रात्री झोपेत विषारी साप चावल्याने १४ महिण्याच्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ३० एप्रिलला पहाटे २ वाजताच्या सुमारास घडली. काव्या वैभव खेवले रा. टाकळी (कुंभा) ता. मारेगाव असे या सर्पदंशाने मृत्युमुखी पडलेल्या चिमुकलीचे नाव आहे.
सोमवारला रात्री आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकलीला मण्यार जातीच्या विषारी सापाने दंश केला. आई नेहमी प्रमाणे आपल्या चिमुकल्या मुलीला जवळ घेऊन खाली झोपली होती. मध्यरात्री अचानक घरात साप शिरला. घरात शिरल्यानंतर सापाने जमिनीवर झोपून असलेल्या बालिकेच्या पायाला चावा घेतला. सापाने चावा घेताच चिमुकली जोरजोरात रडायला लागली. तिच्या रडण्याच्या आवाजाने आई झोपेतून खडबडून जागी झाली. ती आपल्या चिमुकलीला शांत करण्याचा प्रयत्न करीत असतांनाच तिला बिछान्याजवळून साप जातांना दिसला. सापाला पाहून आईने प्रचंड आरडाओरड केली. तिची आरडाओरड ऐकून शेजारी धावून आले. शेजाऱ्यांनी सापाला पकडतांनाच चिमुकलीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार मिळण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. रात्री आईला कवटाळून झोपलेल्या चिमुकलीचा असा हा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चिमुकलीच्या अकाली निधनाने गावात शोककळा पसरली आहे. नियतीने डाव साधून चिमुकलीला आई पासून कायमचे हिरावून घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment