प्रशांत चंदनखेडे वणी
महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा करून त्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात यावा, या मागणीला घेऊन विदर्भ राज्य आंदोलन समितीने वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली. विदर्भ राज्याची निर्मिती व्हावी, याकरिता विदर्भवादी नेते सतत आंदोलन करीत आहेत. वेगळ्या विदर्भाच्या मागणीला घेऊन त्यांनी विधान भवनावर देखील मोर्चा काढला होता. परंतु केंद्र व राज्य सरकार विदर्भवाद्यांची मागणी गांभीर्याने घेत नसून त्यांची आंदोलनं चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु विदर्भवाद्यांनी वेगळ्या विदर्भासाठीचा हा लढा सुरूच ठेवला असून आज १ मे ला विदर्भ राज्य आंदोलन समितीने वेगळ्या विदर्भ राज्यासाठी आंदोलन उभारून १ मे हा काळा दिवस पाळला आहे. विदर्भातील १६ ही जिल्हे व तालुक्यात १ मे महाराष्ट्र दिन हा काळा दिवस पाळण्यात आला. त्यानुषंगाने आज १ मे ला विदर्भ राज्य आंदोलन समिती वणी, मारेगाव व झरीच्या वतीने सकाळी ९.३० ते १०.३० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण करून आंदोलनाची सुरुवात झाली. आंदोलनात विदर्भवादी नेत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. यावेळी विदर्भवाद्यांनी वेगळ्या विदर्भासाठी जोरजोरात नारे दिले.
विदर्भवाद्यांनी महाराष्ट्र दिनाचा निषेध करीत आज काळा दिवस पाळला. आज १ मे ला वेगळ्या विदर्भ राज्यासाठी आंदोलन करण्यात आलं. यावेळी विदर्भवादी नेते प्रा. पुरुषोत्तम पाटील, देवराव धांडे पाटील, नारायण गोडे यांनी वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मिती विषयी आपापली भूमिका मांडली. प्रा. पाटील यांनी आपल्या भाषणात म्हटले की, २८ सप्टेंबर १९५३ ला नागपूर करार करून विदर्भातील जनतेला बळजबरीने महाराष्ट्रात सामील करून घेण्यात आले. परंतु नागपूर कराराच्या कलमांपैकी एकही कलम पाळण्यात आले नाही. त्यामुळे विदर्भात बेरोजगारी, कुपोषण, शेतकरी आत्महत्या व सिंचनाचा अनुशेष वाढला तर आमदार, खासदारांची संख्या कमी झाली आहे. रोजगारासाठी तरुणांना मुंबई, पुणे या सारख्या महानगरांमध्ये भटकंती करावी लागते. विदर्भात वीज प्रकल्प आहेत, पण येथील जनतेला तासंतास अंधारात राहावं लागतं. त्यातल्या त्यात त्यांना प्रदूषणाचाही सामना करावा लागतो. राज्यावर कर्जाचा डोंगर वाढतच चालला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास शक्य नाही. त्याकरिता विदर्भ राज्य निर्मिती हाच एकमेव पर्याय आहे. यावेळी इतरही विदर्भवादी नेत्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले.
या आंदोलनात प्रा.पुरुषोत्तम पाटील, राहुल खारकर, प्रा बाळासाहेब राजुरकर, नामदेव जेनेकर, धीरज भोयर, देवराव पाटील धांडे, होमदेव कनाके, दशरथ पाटील, संजय चिंचोलकर, धिऱज भोयर, बालाजी काकडे, पुंडलिक पथाडे, नारायण गोडे, प्रभाकर उईके, सिध्दार्थ ताकसांडे, प्रा.विजय बोबडे, अंबादास वागदरकर, अशोक चौधरी, प्रा.नितीन मोहितकर, गजेंद्र भोयर, भाऊसाहेब आसुटकर, सुरेश राजुरकर, बबनराव ठाकरे, विठ्ठल येरगुडे, गजानन ठाकरे, प्रमोद जवादे, रोहित येंगड, संबा बोरकर यांच्यासह विदर्भवादी नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
No comments: