प्रशांत चंदनखेडे वणी
घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीला उसनवारीने दिलेले पैसे मागण्याकरिता गेलेल्या महिलेलाच लोखंडी पाईपने मारून जखमी केल्याची घटना वणी तालुक्यातील पळसोनी येथे घडली. याबाबत महिलेने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी महिलेला मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
पळसोनी येथे वास्तव्यास असलेल्या माला रमेश बडवाईक (४७) या महिलेने घराशेजारी राहणाऱ्या संदीप कवडू वानखेडे (३०) याला ७०० रुपये उसणे दिले होते. बरेच दिवस होऊनही त्याने पैसे परत न केल्याने महिला त्याला पैसे मागण्याकरिता गेली असता त्याने सायंकाळी पैसे देतो असे उत्तर दिले. परंतु सायंकाळी पैसे देण्याऐवजी संदीप वानखेडे हा एका हातात लोखंडी व दुसऱ्या हातात प्लास्टिकचा पाईप घेऊन महिलेच्या घरासमोर आला. तू वणीला रुग्णालयात काम करते, तुला रुग्णालयात जातानाच खल्लास करतो, अशी धमकी देत त्याने महिलेशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने आधी पैशाचं काय ते बोल असे म्हणताच त्याने चक्क हातातील दोन्ही पाईपने महिलेला मारहाण करण्यास सुरवात केली. महिलेच्या कंबरेवर व पायावर लोखंडी पाईप मारल्याने महिला जखमी झाली. त्यामुळे महिलेने सरळ पोलिस स्टेशन गाठून मारहाण करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध तक्रार नोंदविली. माला बडवाईक यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी संदीप वानखेडे याच्यावर बीएनएसच्या कलम 118(1), 351(3), 351(2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: