प्रशांत चंदनखेडे वणी
वेकोलिने उकणी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या. त्यांची घरंही घेतलीत. मात्र त्यांना योग्य मोबदला दिला नाही. येथील प्रकल्पग्रस्तांना अजूनही वेकोलि कडून पूर्ण मोबदला मिळाला नसल्याने ते वेकोलि विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याच्या पवित्र्यात आहेत. वेकोलि कडून योग्य व पूर्ण मोबदला न मिळाल्याने प्रकल्पग्रस्तांसमोर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही कायम आहे. त्याचबरोबर उर्वरित जमिनी वेकोलिने अजूनही अधिग्रहित केलेल्या नाहीत. त्यामुळे एका आठवड्यात वेकोलिने याबाबत योग्य निर्णय न घेतल्यास १३ फेब्रुवारी पासून उकणी येथील पीडित शेतकरी चंद्रपूर जिल्ह्यातील ऊर्जाग्राम टाडाळी येथील क्षेत्रिय महाप्रबंधक कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या या मागण्यांना शेतकरी नेते संजय खाडे यांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे. त्यांनी पीडित शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांना पूर्ण सहकार्य करण्याची शाश्वती दिली.
वणी तालुक्यातील उकणी, बेलसणीसह परिसरातील शेकडो एकर जमीन वेकोलिने अधिग्रहित केली. त्यातील उकणी गावाची पुनर्वसन प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. मात्र उकणी खंड नंबर १ मधील १४ ते १५ टक्के जमीन वेकोलिने अद्यापही अधिग्रहित केली गेली नसल्याने त्याचा फटका १७५ शेतकऱ्यांना बसला आहे. ही उर्वरित जमीन विनाअट निलजई डीप विस्तारीकरणासाठी तात्काळ अधिग्रहित करावी. तसेच बांधकाम विभागाने घरांचे मूल्यांकन करतांना जो दर लावला, तो १० वर्षांपूर्वीचा असल्याने प्रकल्पग्रस्तांना अत्यल्प मोबदला मिळत आहे. या मोबदल्यात नवीन घर बांधणं अशक्य आहे. त्यामुळे २०२५ च्या सीएआर रेट नुसार घरांचे मूल्यांकन करून सेक्शन ११ लागले त्या दिवसापासून बांधकाम मूल्यांकनाचा रेट १२ टक्के व्याजदरासह लावून २०२५ पर्यंत मोबदल्याची रक्कम देण्यात यावी, या मागणीसह शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा, भू-धारकांना मोबदला व नोकरी द्यावी या मागण्यांसंदर्भात उकणी वासियांनी वेकोलिच्या क्षेत्रिय महाप्रबंधक यांना निवेदन दिले आहे. या मागण्यांबाबत वेकोलिने एका आठवड्यात योग्य निर्णय न घेतल्यास १३ फेब्रुवारी पासून आमरण उपोषण करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी निवेदनातून दिला आहे.
शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी माझा पूर्ण पाठिंबा : संजय खाडे
जमीन शेतकऱ्यांच्या जगण्याचा आधार आहे. जमिनीशी शेतकऱ्यांची नाळ जुळलेली असते. या परिसरातील बहुतांश नागरिकांची उपजीविका ही शेतीवरच अवलंबून आहे. वेकोलिने शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या. मात्र त्यांना योग्य मोबदला मिळाला नाही. वेकोलिने जमिनी व घरं अधिग्रहित करूनही शेतकऱ्यांच्या वाट्याला उपेक्षाच आली आहे. काही जमिनी अधिग्रहित करणे अजूनही बाकी आहे. वेकोलि जमिनी अधिग्रहित करते पण योग्य मात्र मोबदला देत नाही. त्यामुळे जगाचा पोशिंदा विवंचनेत आला आहे. प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही. लोकप्रतिनिधीही मूग गिळून चूप बसले आहेत. मात्र जगाच्या पोषणकर्त्या शेतकऱ्यांना आपण आगतिक होऊ देणार नाही, त्यांच्यासाठी लढा उभारू, असा निर्धार संजय खाडे यांनी व्यक्त केला आहे.
उर्वरित जमिनी संपादन करण्याकरिता तसेच पुनर्वसन व योग्य मोबदला मिळावा म्हणून यापूर्वीही अनेकदा निवेदने देण्यात आली. मात्र शेतकऱ्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखविण्यात आली. त्यामुळे अखेरचा पर्याय म्हणून आता शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला बसण्याचा निर्धार केला आहे. तसा इशाराही त्यांनी निवेदनातून दिला आहे. निवेदनावर पुरुषोत्तम भुसारी, मंगेश खापणे, विलास खापणे, अर्जुन खापणे, कैलास खरवडे, सुरेश जोगी, नानाजी ढवस, किसन पारशिवे, पद्माकर झाडे, पराग तुराणकर, बालाजी वाढई, विकास लालसरे, संजय बांदूरकर, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
No comments: