प्रशांत चंदनखेडे वणी
शहरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शहरात चोरी, घरफोडी व मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. एका घटनेची शाई वाळत नाही तोच चोरीची दुसरी घटना घडत आहे. दाट लोकवस्ती असलेल्या साधनकरवाडी येथील बंद घर फोडल्याची घटना ताजी असतांनाच चोरट्यांनी नगर पालिकेच्या शाळेला टार्गेट केले. रात्री कुलूपबंद असलेली शाळा फोडून चोरट्यांनी शाळेतील वस्तू, साहित्य व पुस्तकांची देखील चोरी केली. जवळपास ११ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. ६ फेब्रुवारीला सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार देण्यात आली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक ३ मध्ये ५ फेब्रुवारीला रात्री चोरट्यांनी चोरीचा डाव साधला. शाळेतील गॅस शेगडी, खेळांचे साहित्य, शैक्षणिक साहित्य, सीसीटीव्ही डीव्हीआर (हार्डडिक्स), मॉनिटर, इलेक्ट्रॉनिक साहित्य एवढेच नाही तर लायब्ररीतील पुस्तके सुद्धा चोरट्यांनी चोरून नेली. सीसीटीव्ही फुटेज मधून ओळख पटू नये म्हणून चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआरच लंपास केला. चोरट्यांनी शाळेचे कार्यालय व शाळेच्या प्रत्येक वर्गखोल्यांचे कुलूप तोडले. विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनासाठी असलेली पुस्तकेही चोरट्यांनी सोडली नाही. चोरट्यांनी शाळेतील जवळपास ११ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. शाळेत सध्या क्रीडा स्पर्धा सुरु असल्याने स्पर्धेकरिता संघ घेऊन जाण्यासाठी सकाळी शाळेत आलेल्या शिक्षकांना चोरट्यांनी शाळेत घातलेला धुडगूस दृष्टिपथास पडला. शाळेतील सर्व वर्गखोल्यांचे व कार्यालयाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यामुळे शिक्षकांना शाळेत चोरी झाल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी पोलिस स्टेशनला येऊन शाळेत चोरी झाल्याची तक्रार नोंदविली. सिंधू सुरेश गोवारदीपे यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध बीएनएसच्या कलम ३०५(E), ३३४(१) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: