"तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं..." फेम गायिका कडुबाई खरात यांचा उद्या प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम
प्रशांत चंदनखेडे वणी
बहुजनांचे उद्धारकर्ते व लोकशाही प्रधान देश घडविण्यात मोलाचं योगदान देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाही प्रधान देशात मोकळा श्वास घेणाऱ्या जनतेची प्रेरणा वाट आहेत. त्यांनी देशात मानवता रुजविण्याचं काम केलं. जातीभेदाची मानसिकता दूर करण्यासाठी त्यांनी आपलं अख्ख आयुष्य झिजवलं. शिक्षणाचं महत्व अख्ख्या मानवजातीला पटवून दिलं. शिक्षणाच्या समान वाटा सर्वांना उपलब्ध करून दिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला. त्यामुळे असंख्य प्रबोधनकार छाती ठोकपणे त्यांच्यावर प्रबोधन करतात. अनेक गीतकारांनी त्यांच्या संघर्षमय जीवनावर गीते लिहिली आहेत. आणि ख्यातनाम गायकांनी ती गायली देखील आहेत. अशाच एक प्रबोधनकार गायिका कडुबाई खरात यांनी बाबासाहेबांवर एकापेक्षा एक सरस गीते लिहिली व गायली आहेत.
तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं, हा बाबासाहेबांनी पीडित शोषितांसाठी केलेला संघर्ष कडुबाई खरात यांनी आपल्या गीतातून मांडला आहे. "माया भीमानं माय सोन्यानं भरली ओटी", या गीतातून त्यांनी जातीयतेच्या चिखलात खितपत पडलेल्या समाजाला बाबासाहेबांनी किती भरभरून दिलं याचं स्मरण करून दिलं आहे. बाबासाहेबांनी दीनदलित व दुबळ्यांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत केलेला संघर्ष कडुबाई खरात आपल्या गीतातून सांगतात. बाबासाहेबांचे ऋण फेडणं तर कठीण आहे, पण ते विसरलेल्यांना त्याची जाणीव करून देण्याचा विडा कडुबाई खरात यांनी उचलला आहे. त्यांचा बाबासाहेबांच्या धगधगत्या जीवन प्रवासावर आधारित गीतांचा कार्यक्रम वणी शहरात आयोजित करण्यात आला आहे. ८ फेब्रुवारीला कडुबाई खरात वणीला येणार आहेत. त्या पहिल्यांदाच वणीला येत असल्याने त्यांच्या कार्यक्रमाची सर्वांनाच ओढ लागली आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वैचारिक चळवळ तेवत ठेवण्याचा वसा घेतलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच वणीच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्राच्या लोकप्रिय गायिका कडुबाई खरात यांचा बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम शहरात आयोजित करण्यात आला आहे. ८ फेब्रुवारीला सायंकाळी ५.३० वाजता शासकीय मैदानाच्या भव्य पटांगणावर (पाण्याची टांकी) हा संगीतमय प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे. बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित एकापेक्षा एक सरस गीतांनी संपूर्ण भारतात प्रबोधनाची चळवळ चालविणाऱ्या कडुबाई खरात यांचा कार्यक्रम खास वणी उपविभागातील जनतेसाठी आयोजित करण्यात आला आहे. तेंव्हा या कार्यक्रमाला नागरिकांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच वणीचे अध्यक्ष संजय तेलंग, उपाध्यक्ष रामदास कांबळे, घनश्याम पाटील, सचिव घनश्याम ठमके, सहसचिव रमेश तेलंग, कोषाध्यक्ष बंडू कांबळे व सर्व सदस्यांनी केले आहे.
No comments: