प्रशांत चंदनखेडे वणी
चोरट्यांनी शहरात चोरीचा सपाटाच लावला असून चोरटे बंद घरांना टार्गेट करू लागल्याने शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरात घरफोडीच्या घटना प्रचंड वाढल्या असून घडफोडीचे सत्रच सुरु झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. चोरट्यांनी गजबजलेल्या वस्तीतील बंद घराला टार्गेट करून घरातील सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केला. एवढेच नाही तर घरातील पंखे, मोटरपंप, तांब्याचे गुंड, लोटे अशा इतरही वस्तू चोरट्यांनी चोरून नेल्याने हे भुरटे चोर असल्याचे दिसून येत आहे. चोरट्यांनी घरातील एकूण ३ लाख १ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील गुरूनगर परिसरात जनता शाळेजवळ वास्तव्यास असलेले सेवानिवृत्त शिक्षक हरिभाऊ झमाजी विखले (८२) हे २ मे ला परिवारासह नागपूरला गेले होते. ते ३ मे ला जेंव्हा नागपूर वरून परत आले तेंव्हा त्यांना घराचा दरवाजा खुला दिसला. तसेच दरवाजाचा कुलूप कोंडाही तुटलेला दिसला. त्यांनी आत जाऊन बघितले असता त्यांना घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तेंव्हा त्यांना घरी चोरी झाल्याचा अंदाज आला. घरात ठेऊन असलेली ३.५ तोळे वजनाची सोन्याची पोत किंमत २ लाख रुपये, १.५ तोळे वजनाचा सोन्याचा गोफ किंमत ४५ हजार रुपये, ७ ग्रामचा सोन्याचा गोफ व त्यातील १.५ ग्रामचे सोन्याचे लॉकेट किंमत ३० हजार रुपये, ३.५ ग्रामची सोन्याची अंगठी किंमत १० हजार रुपये या मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारतांनाच चोरट्यांनी घरातील सिलिंग फॅन, मोटारपंप, तांब्याचे तीन गुंड, तीन लोटे, पूजेचे लहान मोठे तांब्याचे गंगाळ, पाणी गरम करण्याचे तांब्याचे भांडे, काशाचे दोन ताट, दोन वाट्या, दोन प्लेटा, दोन चमचे, दोन ग्लास, एक लोटा, पितळेचे सहा ताट, सहा वाट्या, सहा प्लेटा, आठ गंज, आठ ताटल्या, नऊ डब्बे, चार ग्लास, पितळेचे लहान मोठे सात गुंड, पितळेचा लोटा, पितळेची बालटी, पितळेची अत्तरदानी तीन पितळेचे कोपर व पितळेची गंगाळ या संसार उपयोगी वस्तूंवर देखील हात साफ केला.
यावरून हे भुरटे चोर असल्याचे असल्याचे दिसून येत आहे. एखाद्याला संसार थाटण्याकरिता लागणाऱ्या सर्व वस्तू या चोरट्यांनी सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरून चोरून नेल्या. सोन्याचे दागिने व संसार उपयोगी वस्तू असा एकूण ३ लाख १ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. घरातील किमती व घरगुती वापराच्या वस्तू चोरट्यांनी चोरून नेल्याने हरिभाऊ विखले यांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर बीएनएसच्या कलम ३३१(३), ३ ३१(४), ३०५(A) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एपीआय अश्विनी रायबोले करीत आहे.
No comments: