मुंगोली-शिंदोला मार्गाच्या दुरुस्तीचा मुहूर्त न निघाल्यास बेमुद्दत रस्ता रोको आंदोलन, फाल्गुन गोहोकार यांचा इशारा
प्रशांत चंदनखेडे वणी
मुंगोली -शिंदोला मार्गाच्या दुरुस्ती करीता वेकोलिने निधी उपलब्ध करून दिल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अद्यापही सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे या रस्त्याने मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना व गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीमुळे शेतातील पिकही धोक्यात आली आहे. त्यामुळे तात्काळ या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात न आल्यास वेकोलिची कोळसा वाहतूक बंद पाडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
मुंगोली-शिंदोला या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वेकोलिची कोळसा वाहतूक सुरु असते. कोळशाच्या अवजड वाहतुकीमुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. वेकोलिच्या कोळसा वाहतुकीमुळे या मार्गाची अतिशय दुरावस्था झाल्याने गावकऱ्यांमधून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होऊ लागली. रस्ता दुरुस्तीची सातत्याने मागणी होऊनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करू लागल्याने रस्ता दुरुस्तीच्या मागणीला घेऊन गावकऱ्यांमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला. त्यानंतर गावकऱ्यांनी मनसेकडे धाव घेतली. मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी गावकऱ्यांना पूर्ण पाठिंबा देऊन वेकोलि व प्रशासनाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. रस्ता दुरुस्तीच्या मागणीला घेऊन त्यांनी गावकऱ्यांसोबत सतत ५ दिवस रस्ता रोको आंदोलन केलं. पाच दिवस वेकोलिची कोळसा वाहतूक रोखून धरली. मात्र नंतर मनसे नेते राजू उंबरकर यांच्या मध्यस्थीतून रस्त्याच्या दुरुस्तीचा तिढा सुटला. वेकोलिने २२ कोटी रुपयांचा निधी या मार्गाच्या दुरुस्ती करीता उपलब्ध करून दिला. सार्वजनिक बांधकाम विभागाला निधी मिळाल्यानंतरही या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु झाले नाही. रस्ता दुरुस्तीचे कंत्राट देऊन ६ महिने लोटले तरी अद्याप या रस्त्याच्या दुरुस्तीचा मुहूर्त न निघाल्याने फाल्गुन गोहोकार यांनी परत एकदा वेकोलिची कोळसा वाहतूक बंद पडण्याचा इशारा दिला आहे.
कोळसा वाहतुकीची शेकडो वाहने दिवसरात्र या मार्गाने धावत असतात. त्यामुळे या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता रहदारी योग्य राहिलेला नाही. या रस्त्यावर नेहमी धुळीचे साम्राज्य पसरलेले असते. रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीमुळे पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. कोळसा वाहतुकीच्या वाहनांमुळे उडणारी धूळ शेत पिकांवर साचून राहत असल्याने पिकं दम तोडू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होऊ लागलं आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याकरिता २२ जुलैला वेकोलि प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. रस्त्यावर धूळ उडणार नाही, याकरिता दररोज ४ टँकर पाणी मारण्याचीही मागणी करण्यात आली होती. मात्र वेकोलि कडून नाममात्र पाण्याचे टँकर सुरु करण्यात आले आहे. मुंगोली-शिंदोला मार्गाची अतिशय दुर्दशा झाल्याने या रस्त्याच्या दुरुतीचे काम तात्काळ सुरु करणे गरजेचे असतांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चालढकल केली जात आहे.
या मार्गाच्या दुरुस्ती करीता वेकोलिने निधी उपलब्ध करून दिल्यानंतरही वेळकाढू धोरण अवलंबिले जात आहे. एवढेच नाही तर या रस्त्याच्या दुरुस्तीचे कंत्राटदाराला कंत्राटही मिळाले आहे. रस्ता दुरुस्तीचा कार्यादेशही देण्यात आला आहे. मग रस्त्याचे काम सुरु करण्याला विलंब का होत आहे, हेच कळत नाही. या रस्त्याच्या दुरुस्तीचे कंत्राट व कार्यादेश मिळूनही कंत्राटदाराकडून रस्त्याचे काम सुरु करण्यास दिरंगाई केली केली जात आहे. तेंव्हा तात्काळ या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु न केल्यास मनसे गावकरी व शेतकऱ्यांना घेऊन स्वातंत्र्य दीना पासून बेमुदत रस्ता रोको आंदोलन करणार असून वेकोलिची कोळसा वाहतूक रोखून धरणार आहे, असा इशारा मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

No comments: