शिवसेना (उबाठा) वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने १३ ऑगस्टला शेतकरी भवन येथे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वात हा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला शिवसेनेचे (उबाठा) जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड व युवासेनेचे जिल्हा प्रमुख अमोल धोपेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच माजी उपजिल्हा प्रमुख दीपक कोकास, महिला संघटिका डीमन टोंगे, शिवसेनेचे मनिष मस्की, जितेंद्र नगराळे, गणपत लेडांगे, संतोष माहुरे, मधुभाऊ वरटकर, देवा बोबडे, माला बदकी, वर्षा किंगरे, सुनिता मस्की, स्वप्ना कलोंडे, सुरेखा भेले, माधुरी नगराळे आदी व्यासपीठावर विराजमान होते.
या कार्यकर्ता मेळाव्यात पाहपळ, चिंचाळा, नगारा रामपूर, चिचमंडळ, मारेगाव शहर व गौराळा सिंधी या गावातील शेकडो नागरिकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेनेच्या गाव तिथे शिवसेना व घर तिथे शिवसैनिक या संकल्पनेला यशस्वी करण्याकरिता संजय देरकर हे वणी विधानसभा क्षेत्र पिंजून काढत आहेत. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आतापर्यंत असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. गावागावात शिवसेनेच्या शाखा तयार करण्यात आल्या आहेत. काही गावांतील शाखा पुनर्गठीत करण्यात आल्या आहेत. कार्यकर्ता मेळाव्यातूनही संजय देरकर यांनी पक्ष वाढविण्यावर सर्वोतपरी भर दिला जात असल्याचे जाहीर केले.
शिवसेनेत कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, राजेंद्र गायकवाड
शिवसेना पक्षाने अनेकांना मोठे केले आहे. त्यांना मानसन्मानाची पदे दिली आहेत. मात्र जिल्ह्यातील नेते महिलांना सन्मान देत नाहीत. कार्यकर्त्यांना दमदाटी करतात. कार्यकर्त्यांना दमदाटी करून शिवसैनिक होता येणार नाही. आम्हाला शिवसेना पक्ष (उबाठा) जिल्ह्यात मोठा करायचा आहे. पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करायचे आहे. पक्ष प्रमुखांच्या आदेशावरून गाव तिथे शिवसेना व घर तिथे शिवसैनिक हे अभियान यशस्वी करायचे आहे. त्यामुळे पक्षात कोणत्याही नेत्याची दमदाटी खपवून घेतली जाणार नाही. उलट दमदाटी करणाऱ्या नेत्यालाच बाजूला सारून पक्ष संघटन बळकट करण्याला प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निष्ठेने पक्षाचं कार्य करावं, असे रोचक विधान राजेंद्र गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन तुळशीराम मस्की यांनी तर आभार प्रदर्शन गोवर्धन टोंगे यांनी केले. कार्यकर्ता मेळाव्याला शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




No comments: