प्रशांत चंदनखेडे वणी
वणी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वागदरा गाव शिवारात सुरु असलेल्या कोंबड बाजारावर पोलिसांनी धाड टाकून कोंबड्याच्या झुंजीवर पैशाची बाजी खेळणाऱ्या दोन आरोपींना अटक केली. ही कार्यवाही रविवार ५ जानेवारीला दुपारच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून १ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शहरालगत असलेल्या वागदरा गाव शिवारात कोंबड बाजार भरविण्यात येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी कुणाला जराही सुगावा न लागू देता त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता तेथे लोकांची मोठी गर्दी दिसून आली. गावातील मंदिराजवळील सार्वजनिक ठिकाणी खुल्या जागेत मोठा कोंबड बाजार भरला होता. तेथे काही इसम कोंबडे भांडवून त्यावर पैशाची बाजी खेळत असल्याचे पोलिसांना आढळून आले. कोंबड्याच्या झुंजीवर पैशाचा जुगार खेळला जात असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी अतिशय चपळतापूर्वक त्याठिकाणी धाड टाकली. मात्र तरीही जुगाऱ्यांना पोलिसांची चाहूल लागली. पोलिस आल्याचे पाहून कोंबड बाजार भरविणारे काही लोक मिळेल त्या रस्त्याने पळत सुटले. परंतु दोन आरोपी मात्र पोलिसांच्या हाती लागले. कोंबड्याच्या झुंजीवर पैशाची बाजी खेळणाऱ्या संकेत मोहन बलकी (२०) रा. उकनी, वकील हुसैन कुरेशी (३८) रा. मारेगाव यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर मजुका कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी तीन मोटारसायकल, दोन कोंबडे, दोन धारदार काती व रोख रक्कम असा एकूण १ लाख ५१ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही धडक कार्यवाही ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी केली.
मुकुटबन पोलिसांचीही कोंबड बाजारावर धाड
मुकुटबन पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिल्कीवाढोणा येथे शेत शिवारात सुरु असलेल्या कोंबड बाजारावर धाड टाकून पोलिसांनी कोंबड्याच्या झुंजीवर पैशाची बाजी खेळणाऱ्या तीन जणांना अटक केली. ही कार्यवाही रविवार ५ जानेवारीला सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. या कार्यवाहीत पोलिसांनी घटनास्थळावरून ६ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मुकुटबन पासून जवळच असलेल्या पिल्कीवाढोणा शेत शिवारात कोंबड बाजार भरला असल्याची विश्वसनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता तेथे शेत शिवारातील घनदाट झुडपात काही इसम कोंबडे भांडवितांना आढळून आले. कोंबड्याच्या झुंजीवर पैशाचा जुगार खेळला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येताच पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याठिकाणी धाड टाकली. मात्र पोलिसांची चाहूल लागताच कोंबड बाजार भरविणारे काही लोक पळत सुटले तर तीन आरोपी पोलिसांच्या हाती लागले. कोंबड्याच्या झुंजीवर पैशाची बाजी खेळणाऱ्या विकास देवाजी राऊत (३५), गजानन फकरु चटारे (३५), दोघेही रा. चिचघाट ता. झरी, मारोती जगनाडे (३६) रा. साखरा ता. वणी या तीन आरोपींना पोलिसांनी घटनास्थळावरून रंगेहात अटक केली. या तीनही आरोपींवर पोलिसांनी मजुका कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ कोंबडे, दोन धारदार कांती असा एकूण ६ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास मुकुटबन पोलिस करीत आहे.
No comments: