प्रशांत चंदनखेडे वणी
महसूल विभागाने ताब्यात घेतलेली वाहने अनेक दिवसांपासून तहसील कार्यलयासमोरील मैदान वेढून असल्याने कार्यालयीन कामांकरिता येणाऱ्या नागरिकांना आपली वाहने पार्क करतांना मोठ्या अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. तहसील कार्यालयासमोरील खुल्या मैदानात ताब्यात घेतलेल्या वाहनांची प्रदर्शनी लावण्यात आल्याने कार्यालयीन कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना आपली वाहने रस्त्यावर उभी करावी लागत आहे. त्यामुळे तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर नेहमी वाहनांचा जाम लागताना दिसतो. कार्यालयीन पार्किंगसाठी असलेलं हे मैदान जप्तीच्या वाहनांनी वेढलं असल्याने कार्यलयांमध्ये येणाऱ्या नागरिकांना आपली वाहने उभी करतांना मोठी डोकेदुखी सहन करावी लागत आहे. त्यामुळे महसूल विभागाने ताब्यात घेलेल्या या वाहनांचे बस्तान येथून हलवावे अथवा त्यांची विल्हेवाट लावावी, अशी मागणी पार्किंग व्यवस्थेअभावी संतप्त झालेल्या नागरिकांमधून होऊ लागली आहे.
तहसील कार्यालयासमोरील मैदानात महसूल विभागाने ताब्यात घेतलेल्या वाहनांचा गराडा दिसून येतो. अनेक दिवसांपासून ही वाहने मैदान घेरून उभी आहेत. येथील काही वाहने जागच्या जागी जीर्ण होऊ लागली आहेत. तर काही वाहनांवर झाडं, वेली व गवतं उगवली आहेत. दुर्मिळ वाहनांची प्रदर्शनी लागल्यागत ही वाहने तहसील कार्यालयासमोर लावून ठेवण्यात आली आहे. या वाहनांनी पूर्ण मैदान व्यापलं आहे. वीरतेचं प्रतीक असलेला जयस्तंभ व तिरंगा झेंडा या वाहनांनी वेढला आहे. प्रजासत्ताक दिन अवघ्या काही दिवसांवरच आला असतांना हे मैदान मोकळं करण्याच्या कुठल्याही प्रकारच्या हालचाली प्रशासनाकडून होतांना दिसत नाही. प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे नागरिकांना चांगलाच मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
तहसील कार्यालय परिसरातच पंचायत समिती, कनिष्ठ न्यायालय, पोलिस स्टेशन, वाहतूक उपशाखा आदी महत्वाची कार्यालये असल्याने येथे नागरिकांची नेहमी वर्दळ दिसून येते. हा परिसर नेहमी नागरिकांच्या गर्दीने गजबजलेला दिसतो. दररोज शेकडो नागरिक या कार्यालयांमध्ये आपली विविध कामे, तक्रारी व समस्या घेऊन येतात. आवश्यक प्रमाणपत्र, विविध दाखले व शिधापत्रिका काढण्याकरिता तहसील कार्यालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी उसळली असते. तसेच पंचायत समिती व न्यायालयातही नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. या सर्व महत्वाच्या कार्यालयांमध्ये नागरिकांचं मोठ्या प्रमाणात जाणं येणं सुरु राहत असल्याने कार्यालयाकडे जाणाऱ्या या छोट्या रस्त्यावर मोठी रहदारी दिसून येते. या कार्यालयांमध्ये कामकाजाकरिता येणाऱ्या नागरिकांची वाहने पार्क करण्याकरिता असलेलं मैदान ट्रॅक्टर व ट्रकांनी वेढलं असल्याने येथे पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. वाहनांच्या पार्किंग करीता जागा अपुरी पडत असल्याने येथे येणारे नागरिक रस्त्यावर व कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच आपली वाहने उभी करतात. त्यामुळे येथे नेहमी वाहनांचा जाम लागताना दिसतो.
पार्किंगअभावी नागरिक रस्त्यावर आपली वाहने उभी करीत असल्याने शासकीय वाहनांनाही जाणे येणे करतांना मोठे अडथळे निर्माण होतात. त्यातच दोन वाहने समोरासमोर आली की मोठी पंचायत होते. दोन वाहने समोरासमोर आली की ती बराच वेळ पास होत नाही, व दोन्ही बाजूंनी वाहनांचा जाम लागतो. त्यामुळे मग वैतागलेले अधिकारी वाहतूक व्यवस्थेवर आपला संताप व्यक्त करतात. वाहतूक व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होताच वाहतूक पोलिसही मग दिसेल ते वाहन चालान करतात. पण पार्किंगची मुख्य समस्या सोडविण्याकडे कोणताही जबादार अधिकारी लक्ष देतांना दिसत नाही. चारचाकी तर सोडाच दुचाकी वाहनेही उभी करण्याकरिता कार्यालय परिसरात जागा शोधावी लागते. अशातच मग काही वाहनधारक कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच वाहने उभी करतात. परिणामी कार्यालयात जाण्याकरिता वाहनांच्या गराड्यातून रस्ता शोधावा लागतो. न्यायालय, पंचायत समिती, पोलिस स्टेशन व तहसील कार्यालयासमोर अगदी रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे नुकतेच काँक्रीटीकरण करण्यात आले. मात्र रस्त्याच्या आजूबाजूला भर टाकण्यात न आल्याने मोटारसायकल रस्त्याखाली उतरून लावणे वाहधारकांना शक्य होत नाही. त्यामुळे वाहनधारक रस्त्यावरच वाहने उभी करतात. परंतु रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे रहदारीला अडथळे निर्माण होत असल्याने वाहतूक पोलिस त्यांची वाहने चालान करतात. तहसील कार्यालयासमोर वाहनांच्या पार्किंग करीता प्रशस्त मैदान असतांना देखील प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. अवैध रेती वाहतूक करतांना पकडलेली वाहने महसूल विभागाने अगदी तहसील कार्यलयासमोरील मैदानावरच लावून ठेवल्याने कार्यालयीन कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना आपली वाहने पार्क करतांना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयासमोरील मैदानावर अनेक दिवसांपासून उभी करून ठेवलेली जप्तीची वाहने येथून इतरत्र हलवावी व हे मैदान छोट्या वाहनांच्या पार्किंगसाठी मोकळं करून द्यावं, अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.
No comments: