शेतातील गोठ्याला आग, शेती उपयोगी वस्तू, साहित्य व गायीचे वासरू जळाले, द्वेष भावनेतून आग लावल्याचा संशय
![]() |
डमी फोटो |
तालुक्यातील उमरी येथे वास्तव्यास असलेल्या प्रविण महादेव मोरे (३६) यांची उमरी गाव शिवारात शेती आहे. शेतात त्यांनी शेती उपयोगी वस्तू, साहित्य व जनावरे बांधून ठेवण्याकरिता गोठा बांधला होता. १ जानेवारीला सकाळी ११ वाजता शेतातील कामे आटोपल्यानंतर ते घरी गेले. त्यानंतर दुपारी ४ वाजता परत ते शेतात आले असता त्यांना शेतातील गोठा जळतांना दिसला. त्यांनी लगेच मोटारपंप लावून गोठ्याला लागलेली आग विझविली. परंतु तोवर गोठ्यातील शेती उपयोगी वस्तू व साहित्य पूर्णपणे जळाले होते. या आगीत बांबू व ताटव्याच्या गोठ्यासह गोठ्यात ठेऊन असलेले ९ स्प्रिंकलर, ३० स्प्रिंकलर पाईप, एक लोखंडी ड्रम व त्यात ठेवलेला ५० किलो तुरीच्या बियाण्यांचा कठ्ठा व कुटार पूर्णपणे जळाले असून गायीचे लहान वासरूही मृत्युमुखी पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे २१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
प्रविण मोरे यांच्या शेताला शेत लागून असलेल्या व्यक्तींचा शेतातील रस्त्यावरून त्यांच्याशी वाद सुरु होता. २७ डिसेंबरलाही त्यांनी प्रविण मोरे यांच्याशी वाद घातला व त्यांना बघून घेण्याची धमकी दिली होती. त्यामुळे शेजारी शेत असलेल्या व्यक्तींनीच द्वेष भावनेतून गोठ्याला आग लावल्याचा संशय त्यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीतून व्यक्त केला आहे. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी संशयीतांवर बीएनएसच्या कलम ३२५, ३२६(f) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात संतोष आढाव करीत आहे.
No comments: