प्रशांत चंदनखेडे वणी
अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या महिलांना शिक्षणाची वाट मोकळी करून देणाऱ्या आद्यशिक्षिका व पहिल्या मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती शहरासह संपूर्ण तालुक्यात उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. अशिक्षित महिलांच्या जीवनात शिक्षणाची ज्योत पेटविणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंती दिनी शहरात ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले. शहरातील सिद्धार्थ वस्तीगृहातही क्रां. सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. पुरुषोत्तम पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष एस. एस. सोनारखन, कोषाध्यक्ष जगदीश भगत, सचिव नवनाथ नगराळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनाथ नगराळे यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर व स्त्रियांच्या शिक्षणासाठी केलेल्या संघर्षावर प्रकाश टाकला. प्रा. पुरुषोत्तम पाटील यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, स्त्री जीवनाला नवी दिशा देण्याचे काम सावित्रीबाईंनी केले. सावित्रीबाई व ज्योतिरावांच्या कार्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात घटनात्मक दर्जा दिला. यावेळी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनीही आपापले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन वसतिगृहाचे अधीक्षक मंगल तेलंग यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता वसतिगृहाचे सेवक कैलास वडस्कर व इतर सहकाऱ्यांनी सहकार्य केले.
No comments: