प्रशांत चंदनखेडे वणी
पाणी पुरवठ्याची नवीन पाईप लाईन टाकण्याकरिता जेसीबीने नाली खोदत असतांना चालकाने चक्क फळाने बहरलेल्या मोसंबीच्या झाडावरच जेसीबी चालविला. खोदकामात कोणत्याही प्रकारचा अडथळा नसलेले मोसंबीचे झाड नगर पालिकेची परवानगी न घेता चालकाने मनमर्जीने तोडले. याबाबत तक्रार करूनही जेसीबी चालक व जेसीबीवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. संबंधित कंत्राटदाराची जेसीबी असल्याने त्याला नगर पालिका प्रशासन पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी या वृक्षतोड प्रकरणाची तक्रार आता थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. त्यामुळे अकारण वृक्षतोड करणाऱ्या कंत्राटदाराच्या जेसीबीवर व त्याच्या चालकावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काय कार्यवाही होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहरातील गौरकार ले - आऊट (रेल्वे स्टेशन जवळ) येथे पाणी पुरवठ्याची नवीन पाईप लाईन टाकण्याकरिता खोदकाम करतांना कुठलाही अडथळा नसलेले मोसंबीचे झाड जेसीबीने तोडण्यात आले. जेसीबी चालकाने अतिशय निर्दयीपणे हे फळाभरलेले झाड जेसीबीने उफटून फेकले. नगर पालिकेची कुठलीही परवानगी न घेता चालकाने मनमर्जीने हिरव्यागार झाडाची कत्तल केली. विशेष म्हणजे नगर पालिकेकडून शहरात वृक्षरोपण मोहीम राबवितांना नगर पालिका कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हे झाड लावण्यात आले होते. नगर पालिकेने लावलेल्या छोट्याश्या रोपट्याचे येथील नागरिकांनी संवर्धन व संगोपन करून हे झाड मोठे केले. आता या झाडाला भरगच्च मोसंबी लागत असतांना निर्दयी जेसीबी चालकाने या मोसंबीच्या झाडावर जेसीबी चालविला. वृक्ष लागवडीचे धडे देणारी नगर पालिकाच अवैधरित्या वृक्षतोड होऊनही मूग गिळून बसली आहे. वृक्ष लागवडीवर लाखो रुपयांचा खर्च करण्यात येतो. मात्र जगलेली झाडे अशी निर्दयीपणे तोडली जात असतांना नगर पालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य वाटत आहे. संबंधित कंत्राटदाराची जेसीबी असल्याने त्याची पाठराखण केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व कंत्राटदारांसाठी वेगवेगळे कायदे आहेत काय, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. केवळ तीन घरापर्यंत खोदकाम करून पाणी पुरवठ्याची पाईप लाईन टाकण्याचे काम बंद करण्यात आले आहे. त्यामुळे नगर पालिकेचा अंधा कारभार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. विकासकामांच्या नावाखाली विनाकारण मोठमोठ्या वृक्षांची कत्तल करून प्रदूषण वाढविण्याला प्राधान्य दिले जात आहे.
शहरात प्रशासनाचे नियम बदलल्याचे दिसून येत आहे. सर्वसामान्यांवर तडक कार्यवाही केली जाते. तर राजकीय व सामाजिक पॉवर असलेल्या व्यक्तींना अभय देण्यात येते. सर्वसामान्यांवर नियमांची सरबत्ती लावून कार्यवाहीचा बडगा उगारणारं प्रशासन राजकीय, सामाजिक व आर्थिक पॉवर असलेल्या व्यक्तींवर कार्यवाही करण्यास धजावत नाही. सर्वसामान्य व्यक्तींविरुद्ध कायद्याची सक्तीनं अंमलबजावणी करणारं प्रशासन पॉवरफुल व्यक्तींचा कार्यवाही पासून बचाव करण्यात कायदेशीर मार्ग काढतांना दिसतं. त्यामुळे प्रशासनातही राजकारण होत असल्याचे अनेकांचे अनुभव आहेत. सर्वसामान्यांना वेगळी वागणूक व खिसे गरम करणाऱ्यांना वेगळी वागणूक दिली जात असल्याने भेदभावाची दरी निर्माण होऊ लागली आहे. धनदांडग्यांपुढे नांगी टाकून सर्व सामान्यांना नियमांचे पाठ गिरवले जात असल्याने नियम सर्वांसाठीच सारखे असल्याच्या संकल्पनेला तडा जाऊ लागला आहे. त्यामुळे प्रशासनाने कार्यवाहीत दुजाभाव न करता वृक्षतोड करणाऱ्या जेसीबी चालक व जेसीबीवर कार्यवाही करण्याची मागणी रविंद्र कांबळे यांनी नगर पालिकेकडे केली होती. मात्र वृक्षतोड करणाऱ्यांवर अद्याप कुठलीच कार्यवाही करण्यात न आल्याने त्यांनी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून कार्यवाहीची मागणी केली आहे.
No comments: