प्रशांत चंदनखेडे वणी
स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या महान समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती संपूर्ण भारतात साजरी केली जाते. त्यांची जयंती बालिका दिवस व स्त्री मुक्तिदिन म्हणून साजरी करण्यात येते. त्यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन केले जाते. शहरातही सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार येत आहे. माळी समाज संघटनेच्या वतीने शहरातील विठ्ठल-रुख्मिणी मंदिर येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्सव-२०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले जयंती उत्सवात यावेळी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. ३ जानेवारीला सकाळी ९ वाजता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर माळीपुरा येथून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक माळीपुरा व छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सावित्रीबाई फुले चौक, महात्मा फुले चौक ते विठ्ठल-रुख्मिणी मंदिर अशी निघणार आहे.
त्यानंतर सकाळी १० वाजता महिलांकरिता रांगोळी स्पर्धा व मुलांकरिता चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. चित्रकला स्पर्धेसाठी पर्यावरण व मतदान माझा हक्क हे विषय ठेवण्यात आले आहे. दुपारी १ वाजता पाक कला स्पर्धा होणार असून या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांनी घरून गोड, तिखट, खारे खाद्य पदार्थ तयार करून आणायचे आहे. दुपारी दोन वाजता महिलांसाठी वेशभूषा स्पर्धा घेण्यात येणार आहे. तसेच दुपारी ४ वाजता सत्कार व व्याख्यानाचा कार्यक्रम होणार आहे. चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या छाया सोनुले यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन महिला माळी संघटना वणीच्या अध्यक्षा रिंकू मोहुर्ले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी प.स. सभापती लिशा विधाते तर प्रमुख व्याखिका म्हणून प्रसिद्ध अधिवक्त्या व सामाजिक कार्यकर्त्या ऍड. वैशाली कावडे यांची उपस्थिती लाभणार आहे. ऍड. वैशाली कावडे यांचं बहुजन समाजातील महिलांची सध्या स्थिती व उपाय या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रामदेवबाबा अपंग मूकबधिर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सरोज भंडारी, वणी वाहतूक उपशाखेच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सीता वाघमारे, माजी नगरसेविका संगीता पेटकुले (चंद्रपूर) आदी मान्यवर महिला उपस्थित राहणार आहेत. यावेळी वणी येथील कु. श्रुती वाढई यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सायंकाळी ७ वाजता बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रम होणार आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती उत्सव समारंभाला जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माळी समाज घटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments: