Latest News

Latest News
Loading...

वरळी मटका व झेंडी मुंडी जुगारावर पोलिसांची कार्यवाही, तीन सट्टेबाजांना अटक

प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरातील दीपक चौपाटी परिसरात सुरु असलेल्या वरळी मटका व झेंडी मुंडी नामक जुगारावर कार्यवाही करून पोलिसांनी मटका पट्टी फडणाऱ्या व झेंडी मुंडीवर पैशाचा जुगार खेळविणाऱ्या तिन आरोपींना ताब्यात घेतले. एसडीपीओ पोलिस पथक व शहर पोलिसांनी ३१ डिसेंबरला दोन वेगवेगळ्या ठिकाणी ही कार्यवाही केली. 

एसडीपीओ पोलिस पथक एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या आदेशावरून शहरात गस्त घालत असतांना त्यांना दीपक चौपाटी परिसरात सार्वजनिक ठिकाणी झेंडी मुंडी नावाचा जुगार सुरु असल्याची खात्रीदायक माहिती मिळाली. या माहिती वरून पथकाने कुणाला जराही सुगावा न लागू देता दीपक चौपाटी परिसरात जाऊन पाहणी केली असता त्यांना तेथे लोकांची मोठी गर्दी दिसून आली. लोकांच्या गर्दीत एका हातगाडीवर दोन इसम सहा वेगवेगळे स्टिकर चिकटून असलेल्या जागी संगोट्या टाकून झेंडी मुंडी नावाच्या जुगारावर पैशाची हारजीत खेळत होते. झेंडी मुंडी जुगारावर पैशाची लगवाडी घेणाऱ्या दोन सट्टेबाजांना एसडीपीओ पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली. झेंडी मुंडी खेळणारे लोक मात्र पोलिसांना पाहून सैरावैरा पळत सुटले. पोलिसांनी झेंडी मुंडीवर पैशाचा जुगार खेळविणाऱ्या गणेश रुषी दुरतकर (३९) रा. जैन ले - आऊट व निखिल भगवान मालेकर (२८) रा. सेलू ता. वणी या आरोपींवर मजुकाच्या कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या जवळून पोलिसांनी रोख २ हजार ५८० रुपये, हातगाडी किंमत ३ हजार रुपये व सांगोट्या असा एकूण ५ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कार्यवाही एसडीपीओ कार्यालयातील प्रदीप ठाकरे, अतुल पायघन, अशोक दरेकर यांनी केली.

दीपक चौपाटी परिसरातीलच दुसऱ्या कार्यवाहीत पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी मटका पट्टी फाडणाऱ्या आरोपीला अटक केली. दीपक चौपाटी परिसरातील नगर पालिका कॉम्प्लेक्स जवळ मटका अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहिती वरून पोलिसांनी तेथे सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर धाड टाकून मटका पट्टी फाडणाऱ्या रवि विजय गज्जलवार (२७) रा. वार्ड क्रमांक २ वागदरा ता. वणी याला अटक केली. एका कागदी पावतीवर मटक्याचे आकडे लिहून देत मटक्याची उतारवाडी घेतांना रंगेहात अटक केलेल्या रवि गज्जलवार या आरोपीवर पोलिसांनी मजुकाच्या कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी मटक्याचे साहित्य व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे.  ही कार्यवाही पोहवा गजानन डोंगरे, पाटील, पोशि. माधव, प्रफुल नाईक यांनी केली.

No comments:

Powered by Blogger.