मृत वाघाची नखे व दात गायब करणाऱ्या चार आरोपींना वन विभागाने केली अटक, एका आरोपीने केला आत्महत्येचा प्रयत्न

प्रशांत चंदनखेडे वणी 

वेकोलिच्या उकनी कोळसाखाण परिसरात जिवंत विद्युत तारांचा स्पर्श होऊन मृत्युमुखी पडलेल्या पट्टेदार वाघाची नखे व दात गायब करणाऱ्या चार आरोपींना वन विभागाने अटक केली आहे. ७ जानेवारीला उकनी कोळसाखाण परिसरातील आर.सी. कार्यालयाजवळील विद्युत डीपी जवळ एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला होता. त्यानंतर ही वार्ता वाऱ्यासारखी तालुक्यात पसरली. वेकोलि अधिकाऱ्यांना ही माहिती मिलताच त्यांनी वनविभागाला कळविले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून वाघाच्या मृतदेहाचा पंचनामा केला असता त्यांना वाघाची १२ नखे व ४ दात गायब असल्याचे दिसून आले. त्यामुळे वन विभागाने वाघाची नखे व दात गायब करणाऱ्या अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरु केला. आरोपींचा युद्ध पातळीवर शोध सुरु असतांनाच वन विभागाला आरोपींबद्दल माहिती मिळाली. वन विभागाने खात्री केल्यानंतर चारही आरोपींना अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. तर दोन आरोपींना वन कोठडी सुनावली आहे.

पांढरकवडा वन विभागांतर्गत येणाऱ्या वणी वनपरिक्षेत्रातील नियत क्षेत्रात येणाऱ्या उकनी कोळसाखाणीत ७ जानेवारीला सकाळी कोळसाखाणीतीलच कर्मचाऱ्यांना एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. कोळसाखाणीत मृत वाघ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. कर्मचाऱ्यांनी ही माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी याबाबत वन विभागाला कळविले. दरम्यान ही वार्ता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी उसळली होती. सकाळी ९.३० वाजता वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत वाघाचा पंचनामा केल्यानंतर त्यांना वाघाची नखे व दात गायब असल्याचे आढळले. त्यामुळे वन विभागाने अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. आरोपींचा शोध घेण्याकरिता अमरावती, यवतमाळ, पांढरकवडा व वणी वन विभागाचे पथक तयार करण्यात आले होते. वाघाची नखे व दात गायब करणाऱ्या आरोपींचा वन विभागाकडून कसून शोध घेतला जात होता. आरोपींचा युद्ध पातळीवर शोध सुरु असतांनाच वन अधिकाऱ्यांना आरोपींबाबत माहिती मिळाली. वन अधिकाऱ्यांना मृत वाघाची नखे व दात गायब करणाऱ्या आरोपींची माहिती मिळताच वन अधिकाऱ्यांनी चारही आरोपींना मोठ्या शिताफीने अटक केली. सतिश अशोक मांढरे (२९), आकाश नागेश धानोरकर (२७) दोघेही रा. वणी, नागेश विठ्ठल हिरादेवे (२७), रोशन सुभाष देरकर (२८) दोघेही रा. उकनी अशी या वन अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वाघाची नखे व दात गायब करण्यामागे त्यांचा नेमका काय उद्देश होता, हे मात्र अद्याप कळू शकले नाही. वणी वन परिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांकडूनही याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. 

वन विभागाने ताब्यात घेतलेल्या चारही आरोपींना आज १७ जानेवारीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडी तर दोघांना वन कोठडी सुनावली आहे. वाघनखे व दात गायब करण्यात आणखी आरोपींचा सहभाग आहे काय, वाघनखे व दात त्यांनी कुणाला विकले की, कुठे लपवून ठेवले, याबाबत वन विभागाचे अधिकारी सखोल तपास करीत आहे. 

अटकेतील एका आरोपीने केला आत्महत्येचा प्रयत्न 

मृत वाघाची नखे व दात लांबविल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. नागेश विठ्ठल हिरादेवे असे या आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याने गळफास घेतल्याचे वन अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला तात्काळ शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला रेफर करण्यात आले आहे. आरोपी हा वन विभागाच्या कस्टडीत असतांना त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणारा आरोपी हा वेकोलीचा कर्मचारी असून वन विभागाने अटक केलेले चारही आरोपी कमालीचे धास्तावले असल्याचे समजते. त्यामुळे त्यांचा वाघनखे व दात गायब करण्यामागचा नेमका हेतू काय होता, हा आता चर्चेचा विषय बनला आहे.

  

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी